महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांची संख्या पाहता, भाजपला रोखण्यासाठी स्वबळावर लढून सत्तेचा डोंगर पार करणे कठीण आहे.
सोलापूर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena), कॉंग्रेस (Congress) व वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) नगरसेवकांची संख्या पाहता, भाजपला (BJP) रोखण्यासाठी स्वबळावर लढून सत्तेचा डोंगर पार करणे कठीण आहे. त्यामुळे महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी सर्वपक्षीय आघाडीसंदर्भात मत मांडले. परंतु, सुरवातीला स्वबळाची भाषा करणाऱ्या कॉंग्रेस व शिवसेना नेत्यांनाही आता कोठेंचे मत रास्त वाटू लागले आहे. त्यांनी स्वबळाची भाषा बदलून कोठेंच्या प्रस्तावाचा विचार करू, असे सांगितले. दुसरीकडे, स्वबळावर लढणाऱ्या विरोधकांना 102 जागांवर उमेदवारही मिळणार नाहीत, अशी टीका भाजपने केली आहे.
महापालिकेत सध्या राष्ट्रवादीचे चार तर कॉंग्रेसचे 14, आनंद चंदनशिवे यांचे (बसप) चार तर एमआयएमचे नऊ नगरसेवक विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेना चार पक्षांच्या तुलनेत स्ट्रॉंग राहिली. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे नेते तौफिक शेख, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तरीही, एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपला महापालिकेतील सत्तेपासून रोखण्याचे आव्हान सहजपणे पेलणे शक्य नसल्याची जाणीव आता महापालिकेतील विरोधकांना झाली आहे. दरम्यान, पहिल्यांदा कॉंग्रेसमधून शिवसेनेत आणि त्यानंतर शिवसेनेतून आता राष्ट्रवादीत गेलेल्या कोठेंबद्दल तिन्ही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर निघू लागला आहे. कोठे, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे या नव्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील जुन्यांचा मानपान कमी झाल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे, प्रभाग सहा आणि सातमध्ये प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेतेच परस्पर विरोधक आहेत. त्यामुळे अशा जागांचा तिढा सामोपचाराने सोडवून महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महेश कोठेंनी मांडलेले मत रास्त आहे. शिवसेनेचे सध्याचे नगरसेवक कोणा एकट्याच्या ताकदीवर निवडून आले नसून शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री तथा सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारावर विजयी झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना दुसऱ्याच क्रमांकावर राहील.
- पुरुषोत्तम बरडे, शिवसेना
ज्या वेळेस स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याचा प्रसंग आला, त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार कॉंग्रेसचेच होते. कॉंग्रेस स्वबळावर सर्व जागा लढण्यास तयार आहे, परंतु आघाडीतील मित्रपक्षांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यातून अंतिम निर्णय घेतला जाईल.
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, कॉंग्रेस
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच अन्य पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यासंदर्भात आगामी काळातील स्थानिक परिस्थिती आणि वरिष्ठांची भूमिका पाहून निर्णय घेतला जाईल.
- महेश कोठे, माजी महापौर
समांतर जलवाहिनीचे काम राजकीय हेतूने थांबवले आहे. सोलापूरकर राज्यातील सत्ताधाऱ्यांना व महापालिकेतील विरोधकांना निश्चितपणे जागा दाखवतील. महेश कोठे यांच्या वक्तव्यावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची ताकद समोर आली आहे.
- विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप
शहर उत्तरमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादीला जागाच नाहीत
माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर या बालेकिल्ल्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. या विधानसभा मतदारसंघात जवळपास 46 जागा आहेत, परंतु त्या ठिकाणी दोन्ही पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. मतदार नोंदणीच्या माध्यमातून भाजपने बूथ यंत्रणा सक्षम करण्यास सुरवात केली आहे. तसेच शहर मध्य व दक्षिण सोलापूर मतदारसंघातही भाजपने लक्ष घातले आहे. दरम्यान, कोठेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश तांत्रिक मुद्द्यावर अडकला असून त्यांच्यासोबत आणखी कोणकोणते नगरसेवक पक्षांतर करतील, त्यावर आघाडीची गणिते अवलंबून असतील, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.