सोलापूर - जातीय वर्ण भेदाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवस शाळा शिकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
त्यांच्या लेखनातून शोषितांच्या संघर्षमय जीवनाला ऊर्जा मिळते. अन्यायविरोधी लढण्याची प्रेरणा मिळते. जगविख्यात थोर साहित्यिकाची आज १०३ वी जयंती आहे. त्यांनी मांडलेल्या प्रखर साहित्यातून अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा कायम मिळते, असे विचार सोलापूरातील काही अण्णा भाऊ प्रेमींनी व्यक्त केले.
अण्णा भाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा हृदयस्पर्शी आहे. दु:ख, दैन्य आणि दारिद्र्याच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली. त्यांचे साहित्य भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा २७ भाषेत भाषांतरित झाले आहे. या साहित्य प्रतिभेच्या महामेरूला सरकारने ‘भारतरत्न’ घोषित करावे आणि ज्ञानपीठ पुरस्कारही द्यावा. १९९५ पासून अण्णा भाऊंची वैचारिक प्रेरणा घेऊन अभिप्रेत असलेली जयंती दरवर्षी सोलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते.
- उत्तमप्रकाश खंदारे, संस्थापक,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती महोत्सव समिती, सोलापूर
अण्णा भाऊंच्या साहित्यातून वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जाती-जमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’ अशा त्यांच्या अनेक भूमिका कायम आम्हाला प्रेरणा देतात आणि अन्याय व अत्याचारा विरोधात लढण्याचे बळ देतात. अण्णा भाऊंची जयंती सर्व समाज एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि त्यांचे विचार तळागाळातील घटका पर्यंत
पोचवितो.
- सुरेश पाटोळे, प्रदेशाध्यक्ष, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना
जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मज भीमराव || अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांची निष्ठा होती. कमी शिक्षणामध्ये अण्णा भाऊंचे साहित्य वैचारिक असून, त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे. त्यामुळे समाजात शिक्षणाची क्रांती घडणे आवश्यक असून सर्वांनी शिक्षण घेऊन आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. अण्णा भाऊंच्या विचाराची शिदोरी समाजाच्या क्रांतीसाठी वापरली पाहिजे
- प्रा. डॉ. दिगंबर झोंबाडे, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.