उपजिल्हा रुग्णालयात माजी सैनिकाच्या शवविच्छेदनासाठी पैसे मागितल्याने करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
करमाळा (सोलापूर) : घरतवाडी (ता. करमाळा) (Karmala) येथील माजी सैनिक पांडुरंग गायकवाड (Pandurang Gaikwad) यांना दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना करमाळा खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी (postmortem) उपजिल्हा रुग्णालय करमाळा (Sub-District Hospital Karmala) येथे दाखल केले. मात्र, करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी सैनिकाच्या शवविच्छेदनासाठी पैसे मागितल्याने करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. माजी सैनिकाच्या नातेवाइकाने या घटनेचा निषेध करत या घटनेची चौकशी करण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
घरतवाडी (ता. करमाळा) येथील माजी सैनिक पांडुरंग गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना करमाळा खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. पोलिस पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन शवविच्छेदनाकरिता डॉक्टरांना सांगितल्यानंतर या ठिकाणी खासगी दोन युवक आले. डॉक्टरांनी पाहणी करून त्या दोन युवकांना शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीचे शवविच्छेदन मोफत करणे आवश्यक आहे. येथे माजी सैनिकाच्या नातेवाइकांना उघडपणे तीन हजार रूपयांची मागणी करण्यात आली. याबाबत मृत माजी सैनिक पांडुरंग गायकवाड यांचे बंधू अनिकेत गायकवाड यांनी जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. एस. डी. जाधव यांना संपर्क केला. मात्र या घटनेची दखल न घेतल्याने अनिकेत गायकवाड यांनी पुणे विभागाचे विभागीय आरोग्य संचालक डॉ. संजोग कदम यांना संपर्क करून घडलेला संपूर्ण प्रकार कानावर घातला. याबाबत आरोग्य संचालक डॉ. संजोग कदम प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्यांनी यावर घडलेल्या प्रकाराची सखोल माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नातेवाइकांनी याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
मृत माजी सैनिक पांडुरंग गायकवाड यांनी बीएसएफमध्ये नोकरी केली होती. यादरम्यान त्यांनी अतिरेक्यांचा सामना करीत प्रत्युत्तर दिले होते. दहशवाद्यांविरोधात केलेल्या कामगिरीबद्दल केंद्र सरकारने त्यांना सन्मानित केले होते. अशा जवानाला मरणानंतर वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असून, नातेवाइकांना वाईट अनुभव आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे
शवविच्छेदनासाठी मृताच्या नातेवाइकांना पैसे मागणे ही बाब फारच लाजिरवाणी आहे. आम्ही विनंती करूनदेखील संबंधित व्यक्ती आम्हाला तीन हजार रुपयांची मागणी करीत होती. मात्र तडजोडीअंति आम्हाला एक हजार रुपये द्यावेच लागले. याकडे वैद्यकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. नातेवाईक दु:खामध्ये असतानादेखील हे लोक येथून हलत नाहीत. त्यामुळे त्यांना आम्हाला पैसे द्यावे लागले. पण करमाळा उपजिल्हा रुग्णालयात घडत असलेला हा प्रकार निंदनीय असून याकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहिले पाहिजे.
- अनिकेत गायकवाड, घरतवाडी, ता. करमाळा
करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मदतनीस असलेला शासकीय माणूस उपलब्ध नाही. गायकवाड यांच्या कुटुंबीयांना संबंधित खासगी माणसाने आमच्या परस्पर पैसे मागितल्याचा प्रकार घडला आहे. आज जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून शासकीय कर्मचाऱ्याची मागणी करणार आहे.
- डॉ. अमोल डुकरे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.