बार्शी : येथील एकविराई गल्लीत राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रसन्न विद्याधर जगदाळे या पंधरा वर्षाच्या अवलियाने आजपर्यंत बुद्धिबळ स्पर्धेत तब्बल ५० चषके आणि २० पदके कमावत बक्षिसाचे अर्धशतक साजरे केले आहे.
लहानपणापासूनच खेळाची आवड असलेला प्रसन्न येथील महाराष्ट्र विद्यालयात नववीत शिकत आहे. राज्य आणि आंतरराज्याच्या अनेक बुद्धिबळ स्पर्धेमुळे परराज्यात किंवा राज्याच्या विविध भागात प्रवास करावा लागत असला तरी अभ्यासातही प्रसन्न कमालीचा हुशार आहे.
प्रसन्न याला येथील अनेक स्पर्धेतील यशाबद्दल २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन (फिडे) कडून मानक जाहीर करण्यात आले होत़े. यात त्याला १२४८ मानक (क्लासिकल) मध्ये असे मानांकन मिळाले होते.
तर या वर्षी रॅपिड (जलद) १३८६ आणि ब्लिट्झ या प्रकारात १२७९ असे मानांकन प्राप्त झाले आहे. एखादी स्पर्धा जिंकली किंवा हरल्यावर या गुणांकनात फरक पडत असतो. बुद्धिबळ खेळताना मनाची एकाग्रता, मेंदूची कार्यक्षमता वाढते, बुद्धी तल्लख होते. मनाला प्रसन्न वाटते, म्हणूनच हा खेळ खूप आवडतो, असे प्रसन्न जगदाळे याने सांगितले.
स्पर्धेमुळे शाळेत गैरहजर राहिलो तरी दोन तीन दिवसात सर्व अभ्यास पूर्ण करून घेतो, असेही तो म्हणाला. आई विजया, वडील विद्याधर, आणि पुण्यात संगणक अभियंता असलेली मोठी बहिण प्राप्ती जगदाळे पाठीशी असल्यामुळेच एवढे यश मिळविता आले, यापुढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यासारखे ग्रॅण्डमास्टर होण्याचे स्वप्न आहे, असे प्रसन्न जगदाळे म्हणाला.
मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, बीडसह गोवा, बेळगाव, निपाणी अशा ठिकाणच्या अनेक बुद्धिबळ स्पर्धामध्ये प्रसन्नने चुणूक दाखवली आहे. बार्शीत अनेक ठिकाणच्या स्पर्धेतही यश मिळवले आहे.
डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकाविला आहे. प्रसन्नला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नागपूरचे बुद्धिबळ मार्गदर्शक अनुप देशमुख, सोलापूरचे सुमुख गायकवाड, पोगुल सर आणि बार्शीचे नितीन अग्रवाल यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे.
प्रसन्न तिसरीत शिकत असताना घराच्या गेटमध्ये त्याचे बोट अडकले, बोटाला मार जास्त लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे महिनाभर घरी बसून काय करायचे, म्हणून वडील विद्याधर यांनीच बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले, अन् तेथूनच या खेळाची आवड निर्माण झाल्याचे प्रसन्नने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.