सोलापूर : पुणे ते घोरपडी रेल्वे प्रवासात मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. सागर जनार्दन मारकड (वय 26, रा. माढा, जि. सोलापूर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
दौंड लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणी ताईबाई मारुती पवार (वय 30), कलावती धोंडिबा चव्हाण (वय 65), रूपाली सोमनाथ चव्हाण (वय 21), गणेश शिवाजी चव्हाण (वय 24, सर्व रा. मांडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) निकिता अशोक काळे (वय 20), अशोक अप्पा काळे (वय 35), जमुना दत्ता काळे (वय 20, तिघे रा. भूम, जि. उस्मानाबाद), ताई हनुमंत पवार (वय 35), हनुमंत गणपत पवार (वय 30, दोघे रा. कळमवाडी, जि. सोलापूर), गंगूबाई नामदेव काळे (वय 40, रा. शेलगाव, जि. सोलापूर), सोनू अप्पा काळे (वय 24, रा. शिंगोळी, जि. उस्मानाबाद ) व एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सोमनाथ शिवाजी चव्हाण (वय 19, रा. मांडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा पळून गेला आहे.
हेही वाचा - मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधी कधी?
निघाले होते अंत्यविधीला
पुणे लोहमार्ग पोलिस दलाचे उपअधीक्षक नरेंद्रकुमार गायकवाड व दौंड लोहमार्गाच्या पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी सांगितले की, सागर मारकड हे आपली आई, पत्नी व लहान मुलीसमवेत एका अंत्यविधीसाठी पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेसने कुर्डुवाडी येथे निघाले होते. मध्यरात्री पावणेएक वाजता पुणे रेल्वे स्थानक सोडताच सर्वसाधारण डब्यात गर्दी असल्याने सागरने दरवाजालगतच्या बाकड्यावरील महिलेस पत्नीला बसण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. परंतु महिलेने जागा न देताच सागर यास शिवीगाळ केली. "शिवीगाळ करू नका', असे सांगताच महिलेसमवेत असलेल्या अन्य महिला व पुरुषांनी सागर यास काठीसह हात व पायांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी सागर यास दौंड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
तीन वेळा साखळी ओढली, पण...
सागरच्या पत्नीने तीन वेळा आपत्कालीन साखळी ओढली; परंतु गाडी थांबून पुन्हा सुरू झाली. मारहाणीमुळे सागर बेशुद्ध होऊन पडला होता व त्या दरम्यान एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. दौंड लोहमार्ग पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे सव्वादोन वाजता एक्स्प्रेस दाखल होताच हवालदार कैलास शितोळे व राजू जाधव, रेल्वे सुरक्षा दलाचे दोन जवान यांनी नागरिकांच्या साह्याने मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.