सोलापूर/सांगोला : नवरात्रीनिमित्त भगर आणि साबुदाणा मिश्रित पिठाला मागणी आहे. दुकानदाराने भगर आणि साबुदाणा यांचे संयुक्त मिश्रण करून विक्रीसाठी व स्वतः घरातही वापरले. या पीठाच्या भाकरी खाल्ल्याने दुकानदाराच्या कुटुंबातील आठ जणांना विषबाधा झाली. अन्न औषध प्रशासनाकडून या पिठाचे नमुने घेण्यात आले असून दुकानातील उपलब्ध असलेले साबुदाणा, भगर आणि पीठ असे १०० किलो साहित्य नष्ट करण्यात आले.
सांगोल्यातील शिवाजी चौकातील मे.उत्तम किराणाचे मालक मनोजकुमार ढोले यांनी भगर व साबुदाणा मिक्स करून स्वतः दळून त्याचे पीठ बनवलेली होती. ते दुकानात विक्रीसाठी ठेवले आणि स्वतः:ही घरात नवरात्रात वापरले. गुरुवारी रात्री स्वतः ढोले कुटुंबातील आठ सदस्यांनी भगर पिठाचा वापर करून भाकरी, शेंगा आमटी, ठेचा खाल्ला होता. त्यानंतर पहाटे सर्वांना उलटी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्याने कुटुंबातील सर्वांना अजिंक्यतारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यावर हॉस्पिटलमधून शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी बाधित रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांचा जबाब नोंदवून घेतला. दुकानाची तपासणी करून विक्रीसाठी साठवलेले भगर पीठ, भगर व साबुदाणा या अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. तसेच भगर, साबुदाणा व भगर पीठ यांचा उर्वरित साठा जप्त करून ते नष्ट करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
भगर व इतर उपवासाचे पदार्थ हे चांगल्या दर्जाचे घ्यावे
भगर, साबुदाण्याचे सेवन मर्यादित असला पाहिजे
सकाळी केलेला साबूदाणा आणि भगर सायंकाळी खाऊ नये
भगरीचे सुटे पीठ हातगाडीवरून अथवा खुल्या बाजारातून आणू नये
हे पदार्थ जड असल्याने ते चांगल्या पद्धतीने शिजवले पाहिजे
आरोग्य चांगले राहण्यासाठी भगर, साबुदाणा टाळून शक्यतो फळे, दूध, शेंगा लाडू आदी सकस आहारावर भर द्यावा
नवरात्रामध्ये फळे, दूध आदी सकस आहार घेतले पाहिजे. साबुदाणा आणि भगर हे शरीराला उपयुक्त नाहीत. तसेच नागरिक व व्यापाऱ्यांनी चांगल्या दर्जाचे पॅकबंद असलेल्याच अन्न पदार्थांचे खरेदी करावे, तयार भगर पीठ खरेदी न करता ते स्वतः घरच्या घरी योग्यरीत्या बनवून घ्यावे, भगर हा अन्न पदार्थ योग्यरीत्या शिजवूनच त्याचे सेवन करावे याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- सुनील जिंतूरकर, सहा. आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.