गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करणारे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास नानासाहेब ढेरे यांचा ९८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
करमाळा - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीट (VIt) (ता. करमाळा) या गावात पहिला तिरंगा झेंडा (National Flag) फडकविण्याचा मान मिळालेले व या वयातही गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण (Childrens Education) मिळावे म्हणून प्रयत्न करणारे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास नानासाहेब ढेरे (Bhanudas Dhere) यांचा ९८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. एखाद्या संस्थेचा अध्यक्ष ९८ वर्षाचा असू शकतो यांचे महाराष्ट्रतील हे एकमेव उदाहरण आहे.
१८ फेब्रुवारी १९२४ रोजी भानुदास ढेरे यांचा जन्म झाला. ९८ व्या वर्षी देखिल ते वीट येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात त्यांचा ९८ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे सचिव देविदास ढेरे, मुख्याध्यापक संजय कोळेकर, पर्यवेक्षक दादासाहेब बरडे, मारुती किरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते भावूक होऊन जुन्या आठवणींना उजाळा देत होते. भानुदास ढेरे यांचा ९८ वर्ष वयातही दररोजचा दिनक्रम एखाद्या तरूणाला लाजवेल असाच आहे.
ते दररोज सकाळी ३ ते ४ किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतात. आजही तरूणांना लाजवेल असा त्यांचा दिनक्रम आहे. विशेष म्हणजे त्यांना चष्मा नाही. दात एकदम चांगले असून या वयातही ते ऊस खाऊ शकतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. त्यांना सांप्रदायिक वारसा असून ते माळकरी आहेत. त्यांना दररोज वर्तमानपत्र वाचण्याची आवड आहे. या वयातही ते दररोज शेतात ३ किलोमीटर चालत जाऊन परत येतात. विशेष म्हणजे कोरोनाच्या लाटेही कोरोना काळात सुद्धा त्यांना कधी सर्दी नाही की खोकला नाही. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. ग्रामस्थांत ते भाऊ या नावाने परिचित आहेत.
शिक्षण सातवीपर्यंत झाले असून रावगाव (ता. करमाळा) येथे त्यांनी दोन वर्ष नोकरी केली. नंतर घरची शेती मोठी असल्याने वडिलांनी त्यांना ऐवढी मोठी शेती आहे, तू नोकरी नको करू. तू शेतीच कर म्हणून सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी शिक्षकांची नोकरी सोडून शेती करण्यास सुरवात केली. वीट व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून स्व. सर्जेराव बरडे यांनी संस्थापक केलेल्या श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळात ते होते. गावात भरणारे अनेक ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे वर्ग भरत होते. त्यानंतर शाळेसाठी ४ एकर जागा भानुदास ढेरे यांनी दान केली. आजही शाळेत आल्यानंतर ते शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधतात. शाळेत होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमाला ते आवर्जुन उपस्थित असतात.
१९५७ साली ते करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्व. नामदेवराव जगताप यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. वीट व परिसरात त्यांनी नामदेवराव जगताप यांच्या माध्यमातून अनेक कामे केली असल्याचे ते सांगतात. पैलवानकी करत असल्याने त्यांनी गावात १९६० साली तालीम बांधली. करमाळा-मुंबई हा रस्ता मोरवड-कोर्टी मार्गे जाणार होता. मात्र हा रस्ता वीटमार्गे झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १९६३ साली गावातील दगडी पुल करून घेतला. तसेच ७ पाझर तलाव करण्यासाठी प्रयत्न केल्याच्या आठवणी भानुदास ढेरे सांगतात. त्यांना मोडी भाषेचे उत्कृष्ट ज्ञान आहे.
संस्थेचे अध्यक्ष असलेले माझे वडील भानुदास ढेरे हे आजही शाळा कशी चालते यांची चौकशी करतात. शाळेत महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी त्यांचा आजही आग्रह आहे. या वयात त्यांची प्रत्येक कृती सर्वांसाठी आदर्शवत आहे.
- देविदास ढेरे, सचिव, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, वीट, ता. करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.