- शिवाजी भोसले
सोलापूर - शरिरामधील रक्त कमी झाल्यास प्राणशक्ती अल्प होते आणि सर्व पेशींचे कार्य मंदावते. रक्तातील लोहाचे प्रमाण अल्प होणे, याला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘अॅनीमिया’ आणि आयुर्वेदात पंडुरोग असे म्हणतात. अॅनीमियामुळे व्यक्तीची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती उणावते. मद्य हे यकृताचा शत्रू आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
मद्यपानामुळे होणाऱ्या रोगांचे वर्णन या ग्रंथात केले आहे. पंडुरोग, कावीळ, जलोदर आदी रोग रक्तामधील दोषांमुळे होतात रक्त अन् यकृत यांचा जवळचा संबंध आहे. रक्त विकार होऊ नयेत, यासाठी दक्ष रहा.
रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्याचे प्रमाण कमी होण्याला आपण दिलेले एक सोयीचे नाव आहे. किंवा ‘रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता घटणे म्हणजे ‘रक्तपांढरी’. रक्तपांढरी हा आजार आपल्या देशातला एक प्रमुख आजार आहे. तो इतक्या प्रमाणात आढळतो, की बऱ्याच लोकांना याची ‘सवय’ होते.
इतर काही आजार असल्याशिवाय तक्रार करावी असे वाटत नाही. रक्तपांढरी जास्त प्रमाणात असेल तरच औषधोपचाराचा विचार केला जातो. रक्तपांढरी हा इतका सामान्य रोग असला तरी त्यासाठी लोकभाषेत कोठलेही नाव प्रचलित नाही. रक्तक्षय हा तयार केलेला संस्कृत शब्द आहे. रक्तक्षय हे नाव ‘क्षय’ या घटकामुळे गैरसमज करून देणारे आहे.
सर्वसाधारणपणे ग्रामीण जनतेत, विशेषतः स्त्रियांमध्ये, याचे प्रमाण ५० ते ७० टक्के आढळते. पाच वर्षापेक्षा लहान मुलांमध्येही तेवढेच प्रमाण आहे. हा जास्त करून गरिबीचा आणि कुपोषणाचा आजार आहे. पण हा आजार आपल्या देशात श्रीमंतांनाही होतो.
रक्तपांढरी म्हणजे काय?
आपल्या रक्तात हिमोग्लोबीन हे लाल रक्तद्रव्य असते आपल्या रक्तात रक्तद्रव्याचे प्रमाण दर १०० मिली. मध्ये सुमारे १५ ग्रॅम इतके असायला पाहिजे. हे रक्तद्रव्य तांबड्या पेशींमध्ये भरलेले असते. या तांबड्या पेशी हाडांच्या पोकळयांमध्ये तयार होतात. रक्तपेशी सुमारे १२० दिवस रक्तात राहतात. त्यानंतर पांथरीमध्ये त्या ‘मोडीत’ निघतात. त्यातून निघालेल्या रक्तद्रव्याचे विघटन होऊन प्रथिने, लोह, इत्यादी घटक वेगवेगळे होतात.
काही भाग परत वापरण्यासारखा नसतो, तो लघवीवाटे व मळावाटे बाहेर टाकला जातो. हा बाहेर टाकला जाणारा पदार्थ पिवळा असतो. म्हणूनच लघवी व मळ पिवळसर असतात. काविळीचा पिवळा रंगही याच द्रव्याचा असतो. उरलेल्या घटकांपैकी लोह व प्रथिने परत नवीन रक्तपेशी करण्यासाठी वापरले जातात.
रक्तपांढरीची कारणे
रक्तपांढरीत रक्तातील रक्तद्रव्याचे एकूण प्रमाण कमी असते. रक्तपांढरीचे दोन मुख्य प्रकार आहेत. (अ) रक्तपेशींची संख्या व प्रमाण कमी असणे किंवा (ब) पेशीतल्या रक्तद्रव्याचे प्रमाणच कमी असणे हेच जास्त महत्त्वाचे कारण आहे.
रक्तद्रव्याचे प्रमाण : ग्रॅम १०० मिली
(अ) रक्तपेशींची संख्या कमी असणे
प्रत्येक मिली. रक्तामध्ये तांबड्या रक्तपेशींची संख्या सुमारे ५० लाख असते.
या पेशींची निर्मिती कमी वेगाने आणि विघटनाचे प्रमाण त्यापेक्षा जास्त असेल तर एकूण पेशींची संख्या कमी होते. यामुळे रक्तपेशींची ‘टंचाई’ तयार होते. रक्तस्रावामुळेही रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते. मासिक पाळी, बाळंतपणातील रक्तस्राव, आतडयातून रक्त शोषणा-या हुककृमी, इत्यादी कारणांमुळे रक्तपेशींची संख्या कमी होऊन रक्तपांढरी होऊ शकते.
शरीरात कोठेही दीर्घकाळ जंतुदोष राहणे, पू-गळू, क्षयरोग, विषमज्वर, इत्यादी आजारांत रक्तपांढरी होते. या आजारात रक्ताचा जास्त प्रमाणात नाश होतो.
कर्करोगातही रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. विशेषतः कर्करोग पसरण्याच्या पायरीवर तर रक्तपांढरी असतेच.
हिवतापात वेळीच उपचार झाला नाही तर तांबडया पेशींची संख्या कमी होऊन निस्तेजपणा येतो. अशी विविध कारणे असल्यामुळे रक्तपांढरीमागचे कारण ओळखून त्यावर उपचार होणे आवश्यक आहे.
(ब) रक्तद्रव्य कमी असणे
रक्तद्रव्य तयार करण्यासाठी लोह, प्रथिने आणि ‘ब’ जीवनसत्त्व हे प्रमुख घटक लागतात. यातील कोठलाही घटक कमी पडला तर रक्तद्रव्य पुरेसे तयार होत नाही. यामुळे प्रत्येक तांबडया पेशीत रक्तद्रव्य कमी प्रमाणात आढळते. या घटकांचा अन्नातून पुरेसा पुरवठा न होणे, हे रक्तपांढरीचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
लोह कमी पडणे
लोह म्हणजे लोखंड. हिरव्या पालेभाज्या, कोंडयासहित धान्य, कडधान्ये, प्राण्यांचे मांस, यकृत यांत विशेष लोह असते. पण स्वयंपाकात लोखंडाची भांडी (तवा, कढई, उलथने, लोखंडी चाकू) वापरतात, त्यापासून काही प्रमाणावर लोहाचा पुरवठा होतो. शरीरात जुन्या रक्तपेशी मोडल्यानंतर निघणारे लोह परत वापरले जाते. म्हणूनच सहसा लोहाची कमतरता होऊ नये. भारतीय शाकाहारी जेवणात लोहाचे प्रमाण कमी असते. त्यातच काही शाकाहारी घटकांमुळे आहे त्या लोहाचे पचन शोषण नीट होत नाही. उदा. कोबी, चहा, इ. पदार्थांनी आहारातले लोह वाया जाते. म्हणून जेवणानंतर अर्धातास चहा घेऊ नये.
आणखी एक म्हणजे सतत, वारंवार रक्तस्राव असेल तर लोहाचा पुरवठा कमी पडतो. (उदा. मासिक पाळीतून होणारा रक्तस्राव, मूळव्याध किंवा हुककृमींमुळे होणारी रक्तातील घट). हुककृमी (आकडेकृमी) या आतड्याच्या आतील आवरणाला जळवांप्रमाणे चिकटून राहतात व रक्त पीत राहतात. दीर्घकाळ हुककृमी राहिल्या तर त्यामुळे रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. या कारणांमुळे स्त्रिया आणि मुलांमध्ये रक्तपांढरीचे प्रमाण जास्त असते.
प्रथिने
कोठल्याही पेशी तयार होण्यासाठी मुख्य वस्तू म्हणून प्रथिनांची गरज असते. प्रथिने म्हणजे शरीराच्या बांधणीतल्या दगड-विटा आणि चुना-सिमेंट असतात. तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठीही प्रथिने लागतात. कुपोषणात रक्तपांढरी हा एक सामान्य घटक असतो. सर्वांगसूज (कुपोषण) झालेल्या मुलांमध्ये रक्तपांढरी हमखास आढळते.
‘ब’ जीवनसत्त्व
‘ब’ जीवनसत्त्वांपैकी एक घटक - फोलिक ॲसिड भाजीपाल्यात आढळणारा आहे. हिरव्या भाज्यांचे प्रमाण आहारात पुरेसे नसेल तर रक्तद्रव्यांची निर्मिती कमी प्रमाणात होते.
आयुर्वेदाचार्य तथा स्त्री रोग तज्ज्ञ डॉ प्रियंका बुबणे-अंबुरे म्हणतात की, आयुर्वेदात वर्णिलेल्या पांडू रोग म्हणजेच ॲनिमिया. याचे पाच प्रकार उल्लेखिलेले आहेत. ह्याचा रोगी भेक वर्णनात्मक म्हणजेच बेडूकची त्वचा जशी रुक्ष असते त्या प्रमाणे, केतकीतनु संनिभम म्हणजेच केवड्याच्या फुलाच्या रंगा प्रमाणे असतो. संबंधित रुग्णाचे असे वर्णन केलेले आहे.
कुपोषण, अंगावरून रक्त जाणे आणि दुर्धर आजार अशा कारणांमुळे हा आजार होतो. पुरुष प्रधान संस्कृतीत घरामधे सर्वात शेवटी राहिलेले अन्न खाणे, शिळे अन्न खाणे, पाळी संदर्भातील समस्या अशा कारणांमुळे भारतात स्त्रियामधे ह्या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते. तथापि, रक्तविकाराशी संबंधित असलेल्या या आजाराबद्दल दक्ष राहाणे योग्य आहे. या आजाराकडे दुर्लक्ष करु नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.