निमगाव (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील ट्रान्सफॉर्मर जळाला त्यावेळी शेतकऱ्यांकडून वर्गणी घेतली. रस्ता करण्यासाठी शेतकऱ्यांकडून वर्गणी घेतली हे कमी की काय म्हणत आता तलावावरील कॅनाॅलच्या दुरूस्तीचे काम देखील शेतकऱ्यांनी वर्गणी करूनच सुरू केले असल्याचे चित्र निमगाव येथे दिसत आहे.
निमगाव (ता.माळशिरस) येथील २४८ एमसीएफटी क्षमतेच्या तलावावर ११.२ कि.मी. लांब कॅनाॅल असून तीस वर्षापूर्वी १९९० साली शेतीच्या पाण्यासाठी खोदला आहे. या कॅनाॅलवर निमगाव व वेळापूर (शेरी) या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. हा कॅनॉल निर्माण झाल्यापासून आजपर्यंत लघु पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे. याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पाटबंधारे विभागाने हा कॅनॉल ताब्यात घेतला नव्हता, त्यामुळे जवळपास सातशे एकर क्षेत्राला याचा फटका बसत होता ही गोष्ट आमदार राम सातपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा व डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लावून धरल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ या कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम करावे व कॅनॉल ताब्यात घ्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत तरी पाटबंधारे विभागाने हा कॅनाॅल ताब्यात घेतला नाही.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून जातील या भीतीने कोरोना काळातही शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्याकडे लाखो रूपयांची पाणीपट्टी भरावी लागते. मात्र पाणीपट्टी भरूनही शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी स्वखर्चाने कॅनाॅल दुरूस्तीचे काम सुरू करावे लागते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेल्या आदेशाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले होते. मात्र अद्यापपर्यंत याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
आ.रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा कॅनाॅल पाटबंधारे विभागाने ताब्यात घ्यावा,असे आदेश दिले होते. परंतु आजपर्यंत पाटबंधारे विभागाने कॅनॉल ताब्यात घेतलेला नाही. अगोदरच कोरोना महामारीने कोणत्याही पिकाला भाव नाही त्यातच पाण्याअभावी डोळ्यादेखत शेतातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी वर्गणीतून कॅनाॅल दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
- विकास श्रीमंत मगर, शेतकरी निमगावनिमगाव इरिगेशन कॅनॉल पाटबंधारे विभागाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असून मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. पाटबंधारे विभागाने लघुपाटबंधारे विभागाकडून हा कॅनॉल ताब्यात घेण्यासंदर्भात एक पाहणी दौरा केला आहे. प्रक्रिया सुरू असून लवकरच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांसमवेत मी स्वतः पाहणी दौरा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार.
- आमदार राम सातपुते, माळशिरस विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.