Solapur - राज्यात मागील तीन वर्षांत दोन हजार २८७ बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश मिळाले. राज्यात सर्वत्र ही प्रथा डोके वर काढत आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत एप्रिल २०२० ते एप्रिल २०२३ या काळात तब्बल सर्वाधिक २२० बालविवाह रोखले आहेत. पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर अशा तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याची स्थिती आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा संपली आहे. त्यानंतर मुलगी शिकून कोठे नोकरी लागणार आहे, सोशल मीडियातून अनेकजण बिघडत आहेत, मुली-महिला पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
कौटुंबिक परिस्थिती देखील अडचणीची आहे, चांगला पती मिळतोय तर लवकरच मुलीचे हात पिवळे करू म्हणून अनेक पालक मुलीचे वय १८ होण्यापूर्वीच विवाह लावून देत आहेत.
परंतु, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संरक्षण कक्षाने जिल्ह्यातील बालविवाह रोखले आहेत.
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील मुलीने दहावीची नुकतीच परीक्षा दिली होती. त्या पालकाला एकूण पाच मुली, विवाह होणारी मुलगी सर्वात मोठी, पण १६ वर्षांचीच आहे. निकाल लागण्यापूर्वीच तिच्या पालकांनी विवाह जमवला आणि मंगळवारी (ता. २) विवाह लावून देण्याचे नियोजन केले. पण, बाल संरक्षण कक्षाने तो विवाह रोखलाच.
हळदीपूर्वीच रोखला बालविवाह
जिल्हा बाल संरक्षण कक्षाने महाराष्ट्र दिनी गादेगाव (ता. पंढरपूर) येथील होणारा बालविवाह रोखला. १६ वर्षीय मुलीचा विवाह २६ वर्षीय युवकासोबत लावला जात होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी माहिती मिळताच तत्परता दाखवत त्याठिकाणी धाव घेतली होती.
पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस हवालदार राहुल शिंदे, श्रीमती मुलाणी, संरक्षण अधिकारी श्री. घाडगे, चाईल्ड लाईनचे योगेश स्वामी यांच्या पथकाने बालविवाह रोखला. बालिकेचा जबाब नोंदवून तिला बालकल्याण समितीच्या यांच्या समक्ष हजर केले असून समितीने बालिकेस बालगृहात दाखल करून घेतले आहे.
मंडप न थाटता साध्या पद्धतीने विवाहाचे नियोजन, पण...
भाळवणीतील (ता. पंढरपूर) एका १६ वर्षीय बालिकेचा विवाह मंगळवारी (ता. २) दुपारी साडेअकरा वाजता होणार होता. तशी माहिती एकाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना दिली.
त्या माहितीच्या अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने विवाहस्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे मंडप दिसत नव्हता. पण, बालिकेच्या हातावरील मेहंदीने पथकाचा संशय बळावला होता. त्यावेळी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली व तिने लग्न होणार असल्याचे सांगितले. त्याक्षणी बालिकेला काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याने तिला बाल कल्याण समितीकडे हजर करून बालगृहात दाखल करून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.