मरगळलेल्या पक्षसंघटनेला ऊर्जितावस्था देत धवलसिंहांनी 'टायगर अभी जिंदा है' यादृष्टीने काम सुरू केले आहे.
सोलापूर : माजी राज्यमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील (Pratapsinh Mohite-Patil) यांचे चिरंजीव डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील (Dr. Dhawalsinh Mohite-Patil) यांच्याकडे कॉंग्रेसने (Congress) जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'जनसेवे'च्या माध्यमातून जिल्हाभर कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. त्या आधारावर जिल्ह्यात कॉंग्रेसची 'धवल'क्रांती होईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहरातील पक्षसंघटना विस्कटू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांचा अंधार दूर करण्यासाठी कॉंग्रेसला शहरात 'प्रकाश' पाडावा लागणार आहे. मात्र, तसे काहीच दिसत नाही.
कॉंग्रेसमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकांनाच आवर्जून उपस्थित राहणाऱ्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांची नावेसुद्धा गावांच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना माहीत नव्हती, अशी अवस्था पक्षाची झाली होती. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटलांनी पक्षसंघटना मजबूत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळणार नाही, हे ओळखून तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या. मरगळलेल्या पक्षसंघटनेला ऊर्जितावस्था देत धवलसिंहांनी 'टायगर अभी जिंदा है' यादृष्टीने काम सुरू केले आहे. दिवाळीनंतर पुन्हा दौरे करण्याचे टाईमटेबल त्यांनी तयार केले आहे.
तर दुसरीकडे, शहरातील माजी पदाधिकारी कॉंग्रेसला हात दाखवत पक्षांतर करू लागले आहेत. महापालिकेतील 14 नगरसेवकांपैकी काही नगरसेवक नाराज असल्याची स्थिती आहे. महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी मित्रपक्षांसह विरोधकांना ताकद दाखविण्याची गरज आहे. मात्र, ठराविक पदाधिकारी वगळता कोणीच बैठकांना उपस्थित राहात नसल्याची स्थिती आहे. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर दौऱ्यावर असल्यानंतर सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात. शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी बोलावल्यानंतर मात्र बहुतेक पदाधिकारी येतच नाहीत, अशीही चर्चा आहे. पक्षाच्या कार्यक्रमात शहराध्यक्षांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे अचानक राष्ट्रवादीत गेले. त्याचा काहीच अंदाज शहराध्यक्ष वाले यांना आला नाही, हे आश्चर्यच.
'साहेब' जिल्हाध्यक्षांना देणार मदतीचा हात
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटलांनी पदभार सांभाळल्यानंतर जिल्हाभर दौरे केले. आता अक्कलकोट, पंढरपूर, माढा व करमाळ्याचा दौरा ते करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोहब) व आमदार प्रणिती शिंदे (ताई) यांच्या माध्यमातून ते पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करणार आहेत. त्यासाठी धवलसिंहांनी त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. सुशीलकुमार शिंदें यांनी यापुढे निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले आहे. परंतु, त्यांची आता पक्षाला मोठी गरज असल्याने ते पुन्हा जिल्ह्यात दौरे करतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.