सोलापूर : निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कोणत्या जागांवर आपला उमेदवार विजयी होऊ शकतो आणि किती जागा मागायच्या, याचे गणित मांडायला सुरवात केली आहे. तर काहींनी आहे त्या पक्षातून उमेदवारी मिळू शकते का, याचा अंदाज घेऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीत ज्यांच्या जागा सर्वाधिक निवडून येतील, त्यांचाच महापौर आणि दुसऱ्या क्रमांवरील पक्षाचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. पण, शहरातील काही प्रभागांमध्ये तिन्ही पक्षांची समान ताकद आहे. त्या प्रभागांवर सर्व पक्षांचा दावा राहणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास त्या पक्षातील अनेकजण विरोधी पक्षात जातील, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग खडतर मानला जात आहे.
राज्याच्या सत्तेतील दुसऱ्या क्रमांवरील राष्ट्रवादीनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे. सध्या महापालिकेत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावरील पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या केवळ चारच जागा विजयी झाल्या. त्यामुळे महापालिकेच्या ११३ जागांपैकी सर्वाधिक जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे भाजपनेही तगडे उमेदवार शोधून सत्तेची रणनीती आखायला सुरवात केली आहे. दरम्यान, जिथे भाजपची ताकद कमी, त्या ठिकाणी विरोधी पक्षातील नाराजांना उमेदवारी मिळू शकते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वबळावर की एकत्रित लढणार? त्यांचे उमेदवार कोण असतील? याचा अभ्यास करून शेवटच्या क्षणी भाजप आपले उमेदवार जाहीर करू शकतो, अशीही चर्चा आहे.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक
दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वच जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय पुढे जाहीर केला जाईल. तूर्तास बूथ बांधणी मजबूत करा, पक्षसंघटन बळकट करून जनतेला सरकारचे विशेषत: शिवसेनेचे कार्य पटवून द्या, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना केल्या आहेत.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी व्हावी, अशी अपेक्षा आहे. पण, शिवसेनेचे सध्या महापालिकेत २२ तर चार राष्ट्रवादीचे आणि १४ काँग्रेसचे नगरसेवक होते. त्या प्रमाणात जागांचे वाटप व्हावे. शिवसेना स्वबळावर लढण्यास देखील तयार आहे.
- पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही, हे वरिष्ठ पातळीवरून ठरेल. जे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत, त्यांना त्यांची ताकद असलेल्या प्रभागातून उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री झाली आहे. तरीही, आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.