सोलापूर : बीएसएनएलची केबल वायर चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले. आकाश चंद्रकांत जाधव (वय 28, रा. शहा नगर, हाउसिंग सोसायटी, वांगी रोड, सोलापूर) आणि भारत ऊर्फ निखिल अर्जुन गायकवाड (वय 27, रा. शहा नगर झोपडपट्टी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी निर्मिती विहारच्या मोकळ्या जागेत पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्या दोघांनी आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बीएसएनएलच्या ऑफिससमोरील डक्ट फोडून त्यातून केबल वायर चोरल्याचे कबूल केले. चोरलेली वायर जाळून त्यातील तांब्याची तार काढून ती विकण्यासाठी ठेवली असल्याचेही पोलिसांना सांगितले.
या दोघांकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहाय्यक फौजदार संजय मोरे, हवालदार राजकुमार तोळणुरे, शावरसिद्ध नरोटे, पोलिस नाईक निकम, इम्रान इनामदार, आलम बिराजदार, विशाल बोराडे, बालाजी जाधव, लक्ष्मण वसेकर, अनिल गवसाने, पिंटू जाधव, उदयसिंह साळुंके यांनी केली.
घरगुती वादातून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
घरगुती वादातून रंजना सूर्यकांत माळी (वय 35, रा. आलेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या महिलेने गोळ्या जादा खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. माळी यांना त्रास होऊ लागल्यावर भाऊ सिद्धाराम माळी यांनी त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
वॉटर प्लॅंटवर तरुणाचा मृत्यू
वॉटर प्लॅंटच्या कामावर गेलेल्या भारत भिवा सलगर (वय 36, रा. बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊच्या पूर्वी सलगर हे दहिटणे - हगलूर रोडवरील छोटेपीर दर्गा येथे बेशुद्धावस्थेत मिळून आल्याने सतीश सलगर यांनी त्यास उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच भारत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
चिंचोळीच्या कारखान्यातील आगीत एक जखमी
चिंचोळी एमआयडीसीमधील सिद्धलक्ष्मी इंजिनिअरिंग प्रा. लि. या कारखान्यात फायर मशिनवर काम करताना आगीचा भडका उडाल्याने समाधान हरिदास बनसोडे (वय 20, रा. रामहिंगणी, ता. मोहोळ) हा तरुण भाजून गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विजेच्या धक्क्याने तरुण जखमी
ृशेतातील पाण्याची मोटार सुरू करीत असताना विजेचा शॉक लागून तौफिक समशोद्दीन नदाफ (वय 26, रा. पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर) हा तरुण जखमी झाला. जखमी अवस्थेत नदाफ यास उपचारासाठी नासिर नदाफ यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.