माढा तालुक्यातील मानेगाव येथील प्रमोदिनी लांडगे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सातासमुद्रापार मानेगावच्या हस्तकलेचा एक आदर्श ठेवला आहे.
मानेगाव (सोलापूर) : घर-कुटुंब सांभाळत माढा तालुक्यातील (Madha Taluka) मानेगाव (Manegaon) येथील स्वयंकृता बचत गटाच्या अध्यक्षा प्रमोदिनी लांडगे (Pramodini Landge) यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सातासमुद्रापार मानेगावच्या हस्तकलेचा एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी टेराकोटा आर्टच्या (Terracotta art) माध्यमातून बनवलेल्या वस्तू ब्राझीलमध्ये (Brazil) गेल्या आहेत व त्या वस्तूंची तेथील पर्यटक व स्थानिकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून मानेगाव येथील या नवदुर्गाचे कौतुक होत आहे.
या टेराकोटा आर्टच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू ब्राझीलमध्ये कशा गेल्या, यावर प्रमोदिनी लांडगे यांनी सांगितले की, पुण्यामध्ये समाजबंध सामाजिक संस्थेत वृक्षारोपण उपक्रम राबवत असताना सहज मातीपासून मी काही वस्तू तयार केल्या. या ठिकाणी काही परदेशी पाहुणे आले होते व त्यांनी याबाबत माझ्याकडील या हस्तकलेचा नमुना पाहिला व ते या हस्तकलेच्या मोहात पडले. त्यांच्याच माध्यमातून माझी पहिली ऑर्डर जून 2021 मध्ये ब्राझील या देशामध्ये केली व त्या ठिकाणी तिथल्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना या कलेची मोठी आवड लागली व त्यांनी तसे पत्र लिहून आमच्या गटाचा सन्मान देखील केला. त्यामुळे या वस्तूंना भविष्यामध्ये मोठी मागणी त्या ठिकाणी राहील व या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, याबाबत विश्वास निर्माण झाला. भविष्यामध्ये ही टेराकोटा हस्तकला अमेरिका व इटली या देशांमध्येही डिसेंबर ते जानेवारीमध्ये पोचणार आहे, असाही आत्मविश्वास प्रमोदिनी लांडगे यांनी व्यक्त केला.
सध्या ग्रामीण भागातील महिलांचे रोजगार पूर्णपणे थांबलेले आहेत. त्यामुळे तरुण महिलांना या उद्योगाकडे आकर्षित केल्यास ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. टेराकोटा आर्ट ही एक दुर्मिळ अशा प्रकारची हस्तकला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण घेऊन केल्यास निश्चितच भारतासह बाहेरील देशातूनही मोठ्या प्रकारची मागणी या वस्तूला होणार आहे. त्यामुळे मी भविष्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून याबाबतचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना देऊन ही कला त्यांना अवगत करून देणार आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही प्रमोदिनी म्हणाल्या.
सध्या मानेगाव येथे 41 बचत गट कार्यरत आहेत व त्यांची जबाबदारी प्रमोदिनी लांडगे यांच्यावर आहे. सर्व गटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे विभागून देऊन हे गट स्वयंसिद्ध कसे होतील याविषयी भविष्यामध्ये विचार करणार आहे. मानेगावामध्ये मोठ्या प्रमाणावर लिंबू उत्पादन होते व यापासून सायट्रिक ऍसिड तसेच मानेगाव येथील बचत गटाच्या माध्यमातून काळा मसाला तयार करून तो बाजारपेठेत नेणार आहोत. सोलापूर जिल्हा परिषदेत सीईओंनी व अधिकाऱ्यांनी आमच्या गटाच्या वस्तू ब्राझील देशात गेल्याची दखल घेऊन केलेले कौतुक अविस्मरणीय आहे, असे लांडगे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
विषेश म्हणजे मला समाजकार्याची आवड आहे. बचत गट म्हणजे फक्त लोणचे, पापड यावर न थांबता आता वेगळ्या वाटा शोधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे फार गरजेचे आहे. या टेराकोटा हस्तकलेच्या माध्यमातून चांगला आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाने बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिल्यास अडचणीत असलेल्या महिलांना जगण्याची नवी दिशा मिळेल.
- प्रमोदिनी लांडगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.