diwali holiday drought list five taluka in solapur student get school food in diwali  Sakal
सोलापूर

Solapur News : विद्यार्थ्यांना दिवाळी सुटीतही पोषण आहार; दुष्काळी पाच तालुक्यासंदर्भात निर्णय, दिवाळीनंतर आहारात अंडी अन्‌ केळी

दिवाळी सुट्यांमध्ये जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : दिवाळी उत्सवाच्या १४ दिवस शाळांना सुट्या आहेत. या दीर्घ मुदतीच्या सुट्यांमध्ये जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त माध्यान्ह भोजन दिले जाते.

सध्या तांदळापासून तयार केलेल्या पाककृतीच्या स्वरूपात हा आहार मिळतो. दरम्यान, अंड्यातील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळावी म्हणून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारात अंड्याचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. ७) शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

बचत गटाच्या माध्यमातून त्याचा पुरवठा होईल. दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येक आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवारी आहारासोबतच शिजवलेले एक अंडे दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा तर ‘माध्यमिक’च्या अनुदानित एक हजार ५४ शाळांमधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याच्या शासन निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शासकीय तसेच शासन अनुदानावर चालणाऱ्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देत असलेल्या नियमित पोषण आहारासोबत अतिरिक्त पूरक पोषणमूल्य मिळण्यासाठी वर्षातील २३ आठवडे अंडी व केळी देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.

यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांची शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाने केली होती.

याशिवाय करमाळा तालुक्यातील लोकविकास फार्मस्प्रोड्यूसर कंपनी, कुगाव येथील द्रौपदी शेतकरी गट यांनी यासंदर्भात निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या केळी उत्पादकांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटाच्या वतीने अनेक दिवसापासून ही मागणी करण्यात येत होती.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शालेय पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्यात आला आहे. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत किंवा ज्यांना अंडी खाण्याची इच्छा नाही , अशा विद्यार्थ्यांना केळी देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या केळीला स्थानिक बाजारपेठेत कायम मागणी राहणार आहे. केळीला चांगला दर मिळण्यासाठी याचा फायदा होणार असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी निर्णय

अंड्यात उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे अंड्याचा आहारात समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारला आहे. दुसरीकडे अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी किंवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. त्याच्या नोंदी ठेवल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी निकषांप्रमाणे त्या पाच तालुक्यांमधील शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही पोषण आहार दिला जाणार आहे. दिवाळीनंतर आहारात अंडी व केळी, याची वाढ होणार आहे.

- प्रसाद मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सध्या केळीला चांगला दर मिळत असला तरी अनेक वेळा हे दर फारच कमी होतात. अशावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही. ‌यामुळे शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करावा, अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ, विविध शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत होता. याला यश मिळाले असून शेतकऱ्यांच्या केळीला चांगला दर मिळण्यासाठी याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास वाटतो.

- वैभव पोळ, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ व लोकविकास फार्मस्प्रोड्यूसर कंपनी, शेटफळ, ता. करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT