सोलापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे ३ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. सरकारकडून अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे स्तनदा माता, गर्भवती महिलांसह ६ महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना जानेवारी- फेब्रुवारीचा आहार अजूनपर्यंत वाटप झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील चार हजार ७३०पैकी चार हजार १३० अंगणवाड्या अजूनही कुलूपबंदच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सव्वालाखांहून अधिक चिमुकली प्रवेशित आहेत. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे मागील दीड महिन्यापासून त्यापैकी एक लाख १० हजार चिमुकली अंगणवाडीत येवू शकलेली नाहीत. त्यांना आहार देखील मिळालेला नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमार्फत एक तास अध्यापन करण्याचे नियोजनही कागदावरच आहे. दरम्यान, मानधन वाढ, नवीन मोबाईल, पेन्शन, ग्रॅच्युइटी, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, अशा मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
आता हातावरील पोट असलेल्या सेविका व मदतनीस महिलांचे मानधन नसल्याने हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी संप मिटविण्याच्या अनुषंगाने दोन पावले मागे घेतली आहेत. पेन्शन व ग्रॅच्युइटी देण्याची लेखी ग्वाही सरकारने दिल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ अशी संघटनांची सध्याची भूमिका आहे. मात्र, सरकारकडून काहीच तोडगा काढला जात नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. संपकरी व सरकार या दोघांमध्ये चिमुकल्यांसह गर्भवती महिला व स्तनदा मातांचे हाल होत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
दोन वर्षाच्या कोरोना काळात चिमुकली घरीच असल्याने अनेकांना मोबाईल, टीव्ही पाहण्याची सवय लागली आहे. स्क्रिनमुळे जिल्ह्यातील आठ हजार चिमुकल्यांना बालवयातच चष्मा लागला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर टीव्ही, मोबाईलची सवय हळूहळू कमी करण्याचा पालकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, दीड महिन्यापासून अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्यांना पुन्हा पूर्वीचीच सवय लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. संप कधी मिटणार याकडे सर्व लक्ष आहे.
पेन्शन व ग्रॅच्युइटी देण्याचे सरकारने मान्य केल्यास आम्ही संप मागे घेण्याच्या तयारी आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही त्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही चर्चा किंवा बैठक घेतली जात नाही. त्यामुळे सरकारने या मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागे घेतलाच जाणार नाही.
- सुर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती
एकूण अंगणवाड्या ४,७३०
अंगणवाड्यांमधील चिमुकली २.६३ लाख
आहारास पात्र गरोदर महिला २५,५०४
आहार मिळणाऱ्या स्तनदा माता २३,४६३
कुलूपबंद अंगणवाड्या ४,१३०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.