सध्या शहरात 15 नागरी आरोग्य केंद्रे असून त्यातील बहुतेक केंद्रांमध्ये उपचाराची दर्जेदार सुविधा उपलब्ध नाही.
सोलापूर : लोकसंख्या वाढल्याने शहराचा विस्तारदेखील वाढला. शहरातील प्रत्येकी 50 हजार लोकसंख्येसाठी एक नागरी आरोग्य केंद्र (Civic Health Center) हवे. सध्या शहरात 15 नागरी आरोग्य केंद्रे असून त्यातील बहुतेक केंद्रांमध्ये उपचाराची दर्जेदार सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर अन्य प्रसूतिगृहे बंद करून डफरीन येथे मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (Multispeciality Hospital) (24 तास सेवा) सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त पी. शिवशंकर (Solapur Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी तयार केला. परंतु, त्याला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केल्याने त्यावर पुढे कार्यवाही होऊ शकली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (Dufferin Multispeciality Hospital in the city is being opposed by local councilors-ssd73)
शहरात हातावरील पोट असणाऱ्यांसह विडी कामगार, बांधकाम, हातमाग कामगारांची मोठी संख्या आहे. त्यांना खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत. सोलापूर हे "मेडिकल हब' म्हणून नावारूपाला येत असतानाच दुसरीकडे शहरातील सर्वसामान्यांना महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमधून दर्जेदार उपचार मिळत नसल्याची स्थिती आहे. तीन वर्षांपूर्वी सहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 50 हजार लोकसंख्येच्या निकषांनुसार उपचार दिले जात होते. परंतु, शासनाकडून त्या सामाजिक संस्थांचा निधी बंद झाल्याने आता त्यांनी काम सोडून दिले आहे. त्यामुळे तेवढ्या लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविताना मनुष्यबळ, यंत्रसामग्रीचा अडथळा येत असल्याची वस्तुस्थिती समोर आली. दुसरीकडे जुळे सोलापूर, नीलमनगर, अवंती नगर, शेळगी या परिसरात आणखी नागरी आरोग्य केंद्रांची गरज आहे. परंतु, त्यासाठी नगरसेवकांकडून रेटा लावला जात नाही. विडी घरकुल परिसरात प्रसूतिगृह उभारले, परंतु ते अजूनही सुरू झाले नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी असताना आता आगामी बजेटमध्ये सत्ताधारी आरोग्याचे बजेट वाढविणार का आणि त्यावर विरोधकांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.
लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात शहरात आरोग्य सुविधा नसल्याने आणखी नागरी आरोग्य केंद्रांना परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविला आहे. तत्पूर्वी, शहरातील सर्व प्रसूती केंद्रे बंद करून डफरीन येथे एकच मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, स्थानिक नगरसेवकांच्या विरोधामुळे पुढे कार्यवाही झाली नाही.
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त, सोलापूर
महापालिकेच्या आरोग्याची सद्य:स्थिती
अंदाजित लोकसंख्या : 12.50 लाख
नागरी आरोग्य केंद्रे : 15
महापालिकेकडील दवाखाने : 8
दरमहा दवाखान्यात येणारे रुग्ण : 42,000
नागरी आरोग्य केंद्रांची गरज : 10
भांडवली कामासाठी भांडता, मग आरोग्य सुविधांचे काय?
शहरातील जुळे सोलापूर, विडी घरकुल, शेळगी, केगाव, देगाव, बाळे परिसराचा विस्तार वाढला. परंतु, त्या ठिकाणच्या नागरिकांना खासगी हॉस्पिटलशिवाय पर्यायच नाही. सर्वसामान्यांना तत्काळ व स्वस्तात उपचार मिळावेत, या हेतूने उपाययोजना करण्याबाबत ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना गांभीर्य आहे. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) व शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांनी काही वर्षांत विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. परंतु, तो इतर कामांवरच खर्च झाला. मागील आठ-दहा वर्षांत त्याच त्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला, परंतु एकही नागरी आरोग्य केंद्र वाढले नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
दर्जेदार सुविधांसाठी बजेटचा अडथळा
महापालिकेकडील दाराशा, रामवाडी, जिजामाता, चाकोते, भावनाऋषी, डफरीन आणि साबळे नागरी आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या प्रसूतीची सोय आहे. त्यापैकी डफरीन आणि चाकोते प्रसूतिगृहात सिझिरियनची सोय आहे. तर मदर तेरेसा व दाराशा नागरी आरोग्य केंद्रात मोफत सोनोग्राफीची सोय आहे. तसेच आता 13 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु, सर्वच ठिकाणी दर्जेदार सर्वोपचार केंद्रे उभारण्याची गरज असतानाही महापालिकेच्या बजेटमध्ये खूप कमीच निधी दिला जात असल्याने ते अशक्य आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.