पांगरी(सोलापूर) ; तालुक्यातीाल पांगरी(ता.बार्शी) भागात गेल्या आठ दिवसापासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या भागातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीन पिक काढणीस येत असताना सततच्या पावसाने शेंगामधून अंकुर बाहेर पडू लागले तर अनेक ठिकाणी हिरव्या शेंगामधून अंकुर फुटू लागले आहे.या भागात कांदा पिकाची ही मोठ्याप्रमाणात लागवड झाली आहे. मात्र पावसामुळे कांदा पिकाची पातीस पिळ व मररोग,करपा यामुळे मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.या निर्माण झालेल्या आसमानी संकटापुढे शेतकरी मात्र हताश झाला आहे.या खरिप हंगामातील पिकांचे पिकविमा पण शेतकऱ्यांनी भरले आहेत. आता विमा कंपनीकडून याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
यावर्षीच्या जूनमध्येच समाधानकारक पाऊस झाल्याने खरिप पिकांतील सोयाबीन, उडीद, मुग, कांदा, मुग, भाजीपाला आदी पिकांची पेरणी लवकरच करण्यात आली. मात्र यावर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणांची उगवणे न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली.पेरणीनंतर अधूनमधून होणाऱ्या कमी अधिक पाऊसावर खरीप पिके जोमात आली. आता गेल्या आठ दिवसापासून रोज दुपारी आणि रात्रीच्या वेळी पाऊस होत असल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने कांदासह अन्य पिकावर मुळकुज, थ्रीपस, डाउणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सुर्यप्रकाश नसल्याने मेहनतीने तयार केलेल्या पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
जवळपास पंधरा वर्षापासून उडीद, तूर, सूर्यफूल, मका, मुग आदी पिके घेतली जात होती. मात्र कालांतराने पिक पध्दतीत बदल होत जाऊन मराठवाड्यात घेतले जात असलेले सोयाबीन पिकाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आणि सर्रास शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली जाऊ लागली. इतर पिकांच्या मानाने या पिकामधून बऱ्यापैकी उत्पादन मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली.
मात्र यावर्षी पावसाळा सुरूवातीस पेरणी योग्य पाऊस झाल्याने पांगरीसह चिंचोली, पांढरी, उक्कडगाव, घोळवेवाडी, शिराळे, गोरमाळे, ममदापूर, जहानपूर, घारी, पूरी, ढेंबरेवाडी अनेक भागात पेरण्या लवकर करण्यात आल्या. मात्र सोयाबीन बियाणे उगवणीमध्ये अडचणी आल्याने अनेक शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यानंतर अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत राहिल्याने पिकांची वाढ इतर वर्षीच्या पिकापेक्षा जास्त वाढ झाली. यात अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव निर्माण झाला. यावर शेतकऱ्यांनी मात करत सोयाबीन पिक शेवटच्या टप्प्यात म्हणजेच हात लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने पुन्हा जोर केला. गेल्या आठ दिवसापासून पाऊस होत असल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. त्यात सुर्यप्रकाश नसल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. या निर्माण झालेल्या स्थितीमुळे काढणीस येत असलेल्या सोयाबीन पिकाच्या वाळलेल्या शेंगासह हिरव्या शेंगामधून अंकुर फुटू लागल्याने शेतकर्यामधून चिंता व्यक्त होत आहे.
मागील वर्षी खरीप हंगामातील कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. रब्बी हंगामातील कांदाचे उत्पादन चांगले झाले. मात्र पाच, दोन रूपये किलो दराने कांदा विकावा लागल्याने केलेला खर्च ही निघू शकला नाही. त्यात अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेपोटी साठवण केलेल्या कांदास पावसाचा तडखा बसल्याने नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामासाठी कांदा रोपे टाकण्यात आली. पाऊस आणि वेळोवेळी वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सुरूवातीस उगवण झालेली रोपे जळून गेली. ज्या ठिकाणी दोन एकर क्षेत्राऐवजी अर्धा एकर क्षेत्रावर लागवड होईल इतपतच रोप हाती लागले. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने खरिप हंगामातील क्षेत्र कमी झाले आहे. पुरेसे कांदा रोप नसल्यामुळे अनेकांनी कांदा पेरणी केली आहे.
या पावसामुळे लागवड व पेरणी केलेल्या कांदा पिकांची पातीस पिळ पडून वाकडी होऊ लागली आहे तर मररोगचा ही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कांदा पिक धोक्यात आले आहे. पिकांना फवारणीद्वारे उपाय करण्यात येत असला तरी पावसाळी वातावरणामुळे यावर फवारणी घेत येत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
हे कडधान्याचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात नसले तरी सर्रास शेतकरी घरखर्चासाठी मुग पिक घेत असतो. समाधनकारक पावसामुळे पिक जोमात आली असताना काढणीच्या वेळी लागून राहिलेल्या पाऊसामुळे शेंगातून अंकुर बाहेर पडले तर अन्य शेंगातील बियाना बुरशी लागून पांढऱ्या पडल्या. त्यामुळे पुर्ण पिक हातून गेले आहे.
उडीद पिकांचा ही पेरा अल्प प्रमाणात असतो. उत्पादन कमी असल्याने भाव हा बर्यापैकी असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
हे पिक या भागातून नामशेष होत चाललेले आहे. उत्पादन व मशागतीस शेतकऱ्यांना फायद्याचे असलेले हे पिक रानडूक्करांच्या उपद्रवामुळे हे पिक घेणे शेतकरी टाळू लागले आहेत. हा भाग म्हणजे बालाघाटाच्या पर्वत रांगाच्या पायथ्याशी येत आहे. त्यामुळे या परिसरात रानडूक्करांचा मोठा वावर आहे.
द्राक्षे हे पैशाचे पिक म्हणून पाहिले जाते. त्यास मोठ्या प्रमाणात मशागत व फवारणीचा ही खर्च तसाच असतो. वाढलेल्या औषध व खताच्या किंमतीत वाढ होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच वेळोवेळी वातावरणात होणारे बदल, सततचा पाऊस यामुळे द्राक्षे बागाही धोक्यात आल्या आहेत. ढगाळ वातावरण व पावसामुळे करपा, जंत्या डाउणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून द्राक्षाची काडी बनली नाही. बागेची पानगळ होऊन फुटण्यास सुरूवात झाली आहे. या निर्माण झालेल्या स्थितीमुळे छाटणी घेतल्याशिवाय पर्याय नाही. परंतु वातावरणामुळे माल निघणे, जिरणे ही समस्या उदभवणार असल्याचे भिती द्राक्षे बागायतदारमधून व्यक्त होत आहे. मागील वर्षी द्राक्षे बागेची स्थिती चांगली होती.कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे द्राक्षास मागणी घडली.त्यामुळे द्राक्षे माल जास्त दिवस झाडावर राहिला गेला.चांगली प्रतीचे द्राक्षे बेभावात विकावी लागली.एप्रिल छाटणीनंतर पाऊस लवकर चालू झाला त्यामुळे काडी लवकर तयार झाली नाही.त्यातच डाऊणी रोगाचा प्रादुर्भाव आला.या सर्व संकटामुळे द्राक्षे बागायतदार अडचणी आले आहेत.
सर्वच पिके हातातून गेली
अतिवृष्टीमुळे व सुर्यप्रकाश नसल्यामुळे सर्वच पिके हातातून गेली आहेत.द्राक्षे बागेमध्ये पाणी साठल्यामुळे फवारणी इतर मशागत थांबली आहे.याचा परिणाम पुढील उत्पादनांवर होणार आहे.तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत.
- समाधान पाटील, द्राक्षे बागायतदार शिराळे
एैंशी टक्के पिके नुकसानीत
अतिवृष्टीमुळे कांदा व सोयाबीन पिकाचे जवळपास 80 टक्के नुकसान झाले आहे.आणखीन पाऊस झाला तर हातात काहीही राहणार नाही. विमा कंपनीने शंभर टक्के विमा मंजूर करावा.
दिपक मुळे, शेतकरी उक्कडगाव
सुचना येताच पंचनामे करू
अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत शासन कडून अद्याप कोणत्या ही सुचना आल्या नाहीत. त्या आल्यानंतर पंचनामे करण्यात येतील.
विलास मिस्कीन, कृषी पर्यवेक्षक पांगरी
नुकसानीचा अहवाल सादर होणार
रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष नदीकाठच्या गावाच्या शेतास आजच भेट देऊन पाहणी करून नुकसानग्रस्त परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
विनोद मुंढे, तलाठी पांढरी सजा
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.