सोलापूर : लहान मुलांमधील जन्मजात विकृती, हृदय, किडनीशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत एकूण एक हजार ६८६ शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. यात १५३ हृदय तर एक हजार ५३३ इतर आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १० हजार ते १० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित हृदय व इतर रोग शस्त्रक्रिया निःशुल्क करण्यात आल्या आहेत. जन्मानंतर काही लहान मुलांमध्ये जन्मतः व्यंग, हृदय, किडनीशी संबंधित आजार, पोषण द्रव्यांची कमतरता, शारिरीक व मानसिक विकासात्मक बदल आढळून येतात.
तर हृदयातील छिद्रामुळे फुफ्फुसांकडे होणाऱ्या अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, वजन न वाढणे यासारख्या समस्या आढळतात. त्यामुळे अशा मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.
तर काही मुलांमध्ये दुभंगलेले ओठ, डोळ्यांचा तिरळेपणा, अस्थिरोग आदी जन्मजात विकृतीही आढळतात. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यामुळे या कार्यक्रमांतर्गत गंभीर आजारांवरील उपचारपूर्व तपासणी व शस्त्रक्रिया केली गेल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन बाल स्वास्थ्य मिशनने केले आहे.
कोरोना काळात ऑनलाईन अध्यापनामुळे मोबाईल वापरातून मुलांमध्ये दृष्टीदोष वाढले. त्यामुळे चला मुलांनो उजेडाकडे मोहीम राबविण्यात आली. चार पथकांमार्फत डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ८०८९ मुलांना दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. त्यापैकी ८९ मुलांवर नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी राज्यातील आठ खासगी रुग्णालयांशी सरकारने करार केला आहे. यात मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, एसआयसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, पुण्यातील मोरया मल्टिस्पेशालिटी चॅरिटेबल,
नागपुरातील नेल्सन मदर अँड चाइल्ड केअर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, किंग्जवे हॉस्पिटल यांचा त्यात समावेश आहे. शिवाय स्थानिक महात्मा फुले जनआरोग्य योजना, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय रुग्णालयांत या शस्त्रक्रिया केल्या जातात.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण ५२ तपासणी पथके कार्यरत आहेत. या प्रत्येक पथकात एक पुरुष व महिला अशा दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता व एक आरोग्य सेविका असे चार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यांच्याकडून वर्षातून दोनवेळा अंगणवाड्यांतील बालकांची तर एकदा शाळांतील सहा ते १८ वयोगटातील मुलामुलींची तपासणी केली जाते. २०२३ - २४ वर्षात ४७५९ अंगणवाड्यांतील तीन लाख ३३ हजार ८०७ बालकांची तर शाळांतील सहा लाख ३३ हजार २९२ मुलांची तपासणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी आरबीएसके डॉक्टर अथवा जिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा. या उपचारासाठी शून्य ते १८ वयोगटातील सर्व मुले पात्र आहेत. त्यासाठी बालकाचा शाळेचा दाखला, डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची मंजुरी लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.