सोलापूर : शहरात कडक लॉकडाउन असतानाही मास्कविना फिरणारे, रस्त्यांवर दुचाकीसह अन्य वाहनातून फिरताना नियमांचे पालन न करणारे, किरकोळ कारणावरून शहरातून ये- जा करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी 13 ते 24 एप्रिल या काळात सहा हजार 533 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 24 लाख 64 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरी अनेकांनी मास्क न घालता आजही नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने कडक लॉकडाउन लागू केला. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. दुसरीकडे, रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणाऱ्या नातेवाइकांना सवलत देण्यात आली. रिक्षाचालकांनाही नियमांचे पालन करून वाहतूक सुरू ठेण्यास परवानगी दिली. सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील घटकांसह किराणा दुकानांसह मटन, अंडी, चिकन, मासे विक्रीसाठी काही तासांची परवानगी दिली. मात्र, विक्रेत्यांसह ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याचे निर्बंध कायम ठेवले. दुचाकीवरून जाताना एकालाच तर अन्य वाहनांसाठी एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीच त्यात असावेत, असे स्पष्ट केले. दरम्यान, शहर- जिल्ह्यात दररोज सरासरी दीड हजार रुग्ण आणि दुसरीकडे 35 ते 40 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत असतानाही अनेकजण नियम पायदळी तुडवत असल्याची स्थिती पोलिस कारवाईतून समोर येत आहे. अशा बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी लावली जात आहे.
निर्बंधाचे तंतोतंत पालन करण्याची गरज
सोलापूरकरांनी कोरोना काळात पोलिसांना खूप सहकार्य केल्यानेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे अंदाज खोटे ठरले. आता कोरोनाचा कठीण काळ असून सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता या नियमांचे पालन करून निर्बंधाचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे; जेणेकरून आपण या संकटावर निश्चितपणे मात करू शकतो.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर
मास्कविना फिरणाऱ्यांना 16.22 लाखांचा दंड
कडक संचारबंदीत मॉर्निंग वॉकला बंदी असून बाजारपेठांत, दुकानात जाताना (घराबाहेर) मास्क घालणे बंधनकारक आहे. तरीही मागील 13 दिवसांत शहरातील तीन हजार 368 व्यक्तींनी मास्क न घालताच शहरात फिरणे पसंत केले. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्या कारवाईतून 16 लाख 82 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या मास्कची किंमत किमान दहा रुपयांपर्यंत असून दंडाची रक्कम प्रत्येकी पाचशे रुपये आहे. डोक्यावर कोरोनाचे संकट असतानाही अनेकजण मास्कविनाच फिरतात, हे विशेष !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.