मरवडे (सोलापूर) : मरवडे (ता. मंगळवेढा) गावच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया गेल्याच आठवड्यात पार पडली. या निवडणुकीच्या वेळेस कोरोना विषाणूची लक्षणे दिसत असूनही एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिला. आता त्याच्यासह इतर दोन सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मरवडेत तीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोना जिंकला, तो आला... त्यानं पाहिलं अन् तिघांना आपलंसं केलं! अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! कोविड केअर सेंटरमधील महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा गोंधळ अन् प्रशासनाचे चौकशीचे आदेश
सोलापूर जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त गाव, मंगळवेढा तालुक्याची राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून मरवडे गावची ओळख आहे. ग्रामपंचायत निवडणुकांना अवघे चार महिने उरले असताना सरपंच ताई मासाळ व उपसरपंच विजय पवार यांनी राजीनामे दिले. नव्याने सरपंच व उपसरपंच निवडीसाठी निवडणूक प्रकिया राबविण्याचे ठरले आणि मरवडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रकियेनंतर नूतन सरपंच कलावती पवार व उपसरपंच सुनीता बनसोडे यांचा सत्कार समारंभ करीत भव्य अशी मिरवणूकही काढण्यात आली. या निवडीवेळी कोरोना साथीची लक्षणे दिसत असूनही एका ग्रामपंचायत सदस्याने हजेरी लावत निवडणुकीचा गुलाल उधळला अन् फटाक्यांची आतषबाजी केली.
निवडणुकीचा गुलाल अंगावर ताजा असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होणाऱ्या "त्या' सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समजताच, उर्वरित सदस्यांची मात्र पाचावर धारण बसली. कोरोना विषाणूबाधित सदस्याच्या संपर्कातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीचे इतर दोन सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोरोनाने गावात प्रवेश केला. प्रथमतः ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गावात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, मरवडे गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण मरवडे गाव व आसपासचा एक किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तर प्रतिबंधित क्षेत्रापासून तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व आस्थापना बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी काढले आहेत. गावातील कोरोनाच्या प्रवेशावरून विरोधकांनी रान उठवले असले तरी मरवडेकरांनी नेहमीच माणसातील माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता माणसावर, माणुसकीवर घाला घालणाऱ्या कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत सुज्ञ ग्रामस्थांनी लढा उभारला आहे.
प्रशासनाचा गलथान कारभार चर्चेत
मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी व त्यांच्याबरोबर ग्रामसेवक व गावकामगार तलाठी हे उपस्थित होते. या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणूक प्रकियेवेळी ग्रामपंचायत सदस्यांव्यतिरिक्त बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना साथीच्या काळात सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असताना सत्कार समारंभ, मिरवणूक या बाबी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णवाढीस याच गोष्टी कारणीभूत असल्याने डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.