सोलापूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ३११ कलमांन्वये पोलिसांवर कारवाई करण्याचे जाहीर केले. ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी ललित पाटलावर नऊ महिने उपचार केले. उपचार कधीही अधिष्ठाता करत नसतात. तसेच पाटील यास फाईव्ह स्टार पद्धतीची सोय करण्यात आली. तिथे महिलांचाही वावर होता, जे थोडेसे चुकीचेच वाटते. पोलिसांची मेहर नजर असल्याशिवाय असे होणे शक्य नाही.
यामुळे ललित पाटील व अधिष्ठाता ठाकूर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांच्यासोबत माजी नगरसेवक चेतन नरोटे व तिरुपती परकीपंडला यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने होत आहे. हा ठाकूर कोण आहे? या ठाकूरवर आजवर कारवाई का झाली नाही. बंडगार्डन पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्त कार्यालय हे ससून हॉस्पिटलच्या अगदी हाकेच्या अंतरावर असताना असा प्रकार घडतोच कसा? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून नव्हे तर केंद्रीय तपास यंत्रणेकडून व्हावा. संबंधित आरोपींचा वावर कायम मंत्र्यांच्या आजूबाजूला होता. पोलिस अधीक्षक झेंडे यांच्याकडेही संशयाची सुई जात आहे. ठाकूरसह झेंडे यांच्या संपत्तीची ही तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरोपींचा होऊ शकतो एन्काऊंटर
या प्रकरणाचा सखोल तपास होत नाही व बहुदा होणारही नाही. अशातच सदर आरोपींचा एन्काऊंटर करून प्रकरण दाबण्याचा प्रकार होऊ शकतो. यासाठी आम्ही पक्ष स्तरावर आणि महाराष्ट्रातील तरुणाईला अमली पदार्थ पासून वाचवण्यासाठी आंदोलन उभे करू, अशा इशाराही धंगेकर यांनी दिला.
पुण्यात येणारी तरुणाई व्यसनांच्या विळख्यात
केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरीसाठी तरुणाई पुण्यात म्हणजे विद्येच्या माहेरघरात येते. जी सध्याला अमली पदार्थांच्या सेवनाकडे जात आहे. याकडे पोलिस प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे, असेही धंगेकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.