पंढरपूर:भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या सुमधुर आणि स्वर्गीय आवाजाने विविध संतांचे अभंग गावून विठूरायाचा महिमा जगभर पोचवला. त्यामुळे सहाजिकच विठूरायाच्या दर्शऩाची आस त्यांना होती. 1992 साली सोलापूर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या असताना लता दिदी या उषा मंगेशकर यांच्या समवेत विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आवर्जुन आल्या होत्या. देवाच्या चरणांना स्पर्श करुन त्यांनी अत्यंत मनोभावे दर्शन घेतले होते.
लतादिदिंनी विविध संतांचे अभंग गावून विठूरायाचा महिमा जगभर पोचवला त्या सावळ्या परब्रम्हाचे दर्शन घेण्याची त्यांची अनेक वर्षे इच्छा होती.
1992 मध्ये लता दिदी त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांच्या समवेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अचानक पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनास येण्याचे ठरवले. भगिनी उषा मंगेशकर यांच्यासह लतादिदी पंढरपूरला आल्या होत्या. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे हे त्यांच्या समवेत आले होते.
माघी वारीचा काळ होता. जिल्हाधिकारी यांनी त्यावेळचे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना फोन करुन त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्या विषयी कळवले होते. श्री.निंबाळकर, भागवताचार्य वा.ना. उत्पात, स्वरसाधनेचे खडके बंधू यांनी मंदिरात मंगेशकर भगिनींचे स्वागत केले होते. त्यावेळी पंढरपूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक आणि पत्रकार रमेश घळसासी हे मंदिर परिसरातच होते.
त्यांना लता दिदी मंदिरात आल्याचे समजताच ते अक्षरशः पळत मंदिरात गेले. त्यामुळे त्यांनाही मंगेशकर भगिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना त्या अत्यंत भाऊक झाल्या होत्या. देवाच्या चरणांना स्पर्श करुन लता दिदी आणि उषा मंगेशकर यांनी देवाचे मनोभावे दर्शन घेतले होते. मंदिर समितीच्या वतीने किशोरराजे निंबाळकर यांच्या पत्नी सौ.निंबाळकर यांच्या हस्ते मंगेशकर भगिनींचा सत्कार करण्यात आला. खडके बंधू यांनी स्वरसाधनेच्या वतीनेही सत्कार केला होता.
पंढरपूरच्या शेतकऱ्याला मिळाली दिदींशी संवादाची संधी
लता दिदी यांचे सर्वच क्षेत्रातील दिग्गजांच्या समवेत, चाहत्यांच्या समवेत जिव्हाळ्याचे संबंध होते तसेच सर्वसामान्यांशीही होते. पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील अक्षय मोरे या शेतकऱ्याचे देखील लता दिदींशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अक्षय मोरे हे अधूनमधून त्यांनी सांभाळलेल्या गायीच्या दूधा पासून बनवलेले तूप लतादिदींसाठी घेऊन मुंबईला त्यांच्या घरी जायचे. तेंव्हा लता दिदी त्यांची आपुलकिने विचारपूस करुन त्यांना जेवायला देत असत. त्यांनी अक्षय मोरे यांना त्यांच्या गाण्याचा संग्रह असलेले एेकण्याचे मशीन आणि कपडे देखील भेट दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.