Corona Esakal
सोलापूर

खबरदारी घेऊन कोरोनावर "अशी' मात करता येते ! सांगताहेत डॉ. प्रदीप आवटे

जाणून घ्या कोरोनाची लक्षणे कशी ओळखावी व त्याला कसे रोखावे

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. त्यात आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र रुग्णांच्या सेवेत गुंतले आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा तुटवडा अशा गंभीर स्वरूपाचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अनेकांना आपल्याला कोरोना झाला का, याबाबत भीती असते मात्र टेस्टिंग व इलाज करून घेण्याची भीती यामुळे अनेकजण अगदी शेवटच्या टप्प्यात असताना रुग्णालयात दाखल होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित इलाज करून घेणे आवश्‍यक आहे. कोरोना झाला हे कसे ओळखावे? कोरोनाची लक्षणे काय आहेत व आपल्याला कोरोना झाला किंवा नाही, हे कसे ओळखावे व त्याचे स्वरूप व त्यावरील इलाज व घ्यावयाची खबरदारी याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे, जी नागरिकांसाठी खूपच फायदेशीर ठरणारी आहे.

आम्ही ई-सकाळच्या माध्यमातून आपणास डॉ. प्रदीप आवटे यांची फेसबुक पोस्ट येथे देत आहोत.

खबरदारी घेऊ आणि कोरोनावर मात करू !

सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे तथापि, आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण या संकटाची तीव्रता कमी करू शकतो.

आपण काय करू शकतो?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाची अनाठायी भीती बाळगू नका.

सर्वत्र याच आजाराचे नाव ऐकू येत असले तरी या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एक टक्केपेक्षा कमी आहे, हे लक्षात ठेवू या. कोरोना झालेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकाला भेदभावाची वागणूक देऊ नका. परस्परांना मदत करा.

कोरोना प्रसार टाळण्यासाठी आवश्‍यक खबरदारी घ्या.

मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, योग्य शारीरिक अंतर पाळणे, गरज नसताना बाहेर न पडणे, हे साधेसुधे नियम पाळणे, आवश्‍यक आहे. तसेच आपण बाधित आल्यानंतर आपल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाला दिल्याने त्या व्यक्तींचा शोध लवकर घेता येतो आणि प्रसाराला आळा घालता येतो.

कोरोना आजाराची जोखीम कुणाला जास्त आहे?

  • ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार किंवा लिव्हर, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे वजन जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची गुंतागुंत अधिक प्रमाणात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोरोनाची खबरदारी घेणे अत्यावश्‍यक आहे.

  • कोरोनाची लक्षणे समजून घ्या आणि ती अंगावर काढू नका.

  • ताप, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, वास न येणे, थकवा, धाप लागणे ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही वेळा उलटी, जुलाब अशी वेगळी लक्षणेही आढळतात. ही लक्षणे आढळली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्री झोप झाली नाही, काल काही तरी तेलकट खाण्यात आले म्हणून असे होत असेल असे म्हणून लक्षणे अंगावर काढू नका. आपल्याकडे ग्रामीण भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र कार्यरत आहे. या प्रत्येक उपकेंद्रात एक नर्स आणि एक आरोग्यसेवक आहेत. याशिवाय प्रत्येक तीस हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) आहे. इथे जाऊन वैद्यकीय सल्ला घ्या. प्रत्येक आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्टची व्यवस्था आहे. त्यामुळे कोरोना आजाराचे लवकर निदान होईल. वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्या. शहरी भागातही वेगवेगळ्या केंद्रांमध्ये टेस्टिंग, तपासणीची व्य्वस्था करण्यात आलेली आहे.

  • आपापल्या भागातील हेल्पलाइनची माहिती असणे आवश्‍यक आहे.

घरगुती विलगीकरण

कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होऊ शकतात. पण कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य स्वरूपाच्या प्रत्येक कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही. ज्या रुग्णाच्या घरी पुरेशी जागा आहे, रुग्णासाठी वेगळी खोली, टॉयलेट आहे अशा ठिकाणी लक्षणे विरहित किंवा सौम्य स्वरूपाच्या रुग्णाची देखभाल घरच्या घरी घेणे शक्‍य आहे. अर्थात याबाबत एकच एक नियम नाही, प्रत्येक रुग्णानुसार हा निर्णय घ्यावा लागतो. ज्यांचे घर छोटे आहे, रुग्णासाठी वेगळी खोली नाही तिथे हे शक्‍य नाही. तसेच लक्षणे जरी सौम्य असतील पण रुग्णास इतर जोखमीचे आजार असतील आणि वय जास्त असेल तर अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केलेले अधिक चांगले. हा निर्णय त्या त्या ठिकाणच्या डॉक्‍टरांनी घेणे अधिक योग्य.

घरच्या घरी कोरोना रुग्णांची काळजी घेताना कोणते नियम पाळले पाहिजेत, हे समजून घेऊ या

  • रुग्णाने 24 X 7 वेगळ्या खोलीत रहायला हवे आणि हॉल/किचनमध्ये येणे पूर्णपणे टाळायला हवे.

  • घरात वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळणे अधिक महत्वाचे!

  • रुग्णाने आणि रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ट्रिपल लेयर सर्जिकल मास्क वापरावा.

  • घरातील निश्‍चित अशा एकाच व्यक्तीने रुग्णाची नियमित काळजी घ्यावी.

  • काळजीवाहू व्यक्तीने आपल्या हाताची स्वच्छता जपली पाहिजे. काळजीवाहू व्यक्तीने घरातील वस्तू, पृष्ठभाग नियमित स्वच्छ करावेत.

  • रुग्णाचे कपडे, प्लेट्‌स आणि इतर गोष्टी शेअर करू नयेत.

  • आठ तास वापरून झाल्यावर किंवा ओले /खराब झाल्यानंतर मास्क बदलावेत. मास्क प्रथम 1 टक्का सोडियम क्‍लोराईट द्रावणात टाकावेत आणि नंतर जाळून अथवा जमिनीत खोल पुरून टाकावेत.

  • रुग्णाने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू ठेवावेत.

  • रुग्णाने डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावा. तपमानाची नियमित नोंद ठेवावी. पल्स ऑक्‍सिमीटरद्वारे रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण दिवसातून तीन वेळा मोजावे.

  • ऑक्‍सिजनचे प्रमाण 93 पेक्षा कमी होणे गंभीर आजाराचे लक्षण आहे. दिवसातून एक वेळा 6 मिनिटे वॉक टेस्ट करा.

  • रुग्णाने आपल्या प्रकृतीची माहिती दैनंदिन स्वरूपात स्थानिक डॉक्‍टरांना द्यावी. लक्षणे वाढत असल्यास डॉक्‍टर योग्य निर्णय घेऊ शकतात.

  • आपण घरगुती विलगीकरणात आहोत आणि आपल्याला फारशी लक्षणे नाहीत म्हणून या रुग्णांनी छोट्या मोठ्या कारणांसाठी घराबाहेर पडणे, इतर लोकांसोबत मिसळणे टाळले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपले आयसोलेशन शिस्तीने पाळणे आवश्‍यक आहे.

  • कोरोना रुग्णाची काळजी घरगुती पातळीवर नीटपणे घेता यावी यासाठी स्थानिक डॉक्‍टर आणि रुग्ण यांचा उत्तम समन्वय असावा तरच "घर, मेरा अस्पताल' हे प्रत्यक्षात येणे शक्‍य आहे.

सहा मिनिटे चालण्याची टेस्ट

  • जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत त्यांनी दिवसातून कमीत कमी एक वेळा ही सोपी चाचणी करावी.

  • तुमच्या बोटाला पल्स ऑक्‍सिमीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्‍सिजन पातळीची नोंद करा.

  • आता पल्स ऑक्‍सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे फिरा.

  • सहा मिनिटांचे चालणे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्‍सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

  • निष्कर्ष

  • सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्‍सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर अगदी उत्तम.

  • जर ती केवळ एक- दोन टक्‍क्‍यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही.

  • रक्तातील ऑक्‍सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर 93 पेक्षा कमी होत असेल किंवा चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा 3 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकने कमी होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम / धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्‍सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. वेळेत भरती होणे आवश्‍यक.

  • 60 वर्षांवरील व्यक्तीसाठी 6 मिनिटाऐवजी 3 मिनिटांची वॉक टेस्ट करावयाला हरकत नाही.

  • या प्रकारे व्यवस्थित घरगुती काळजी घेतल्याने शंभरातील बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होतात. आणि ज्यांना भरती करण्याची गरज आहे, ते वेळेत लक्षात येऊन त्यांना वेळेत भरती करता आल्याने गुंतागुंत आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागतो.

फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी पोटावर झोपा

  • कोव्हिडची लक्षणे असतील तर आपण जागेपणी पालथे झोपण्याची सवय लावावी. दिवसातील शक्‍य तेवढा वेळ पोटावर झोपल्यास फुप्फुसाचे सर्व भाग उघडले जाऊन ऑक्‍सिजन सर्व भागास पोहचतो. अगदी सुरुवातीपासून या पद्धतीचा वापर केल्यास त्याचा रुग्णाची ऑक्‍सिजन पातळी उत्तम ठेवण्यास मदत होते.

  • फुप्फुसाचा प्रत्येक भाग उघडला जाऊन ऑक्‍सिजन खोलपर्यंत पोहचावा यासाठी विविध प्रकारे 30 मिनिटे ते 2 तास झोपल्यास त्याचा फायदा होतो.

  • पोटावर झोपणे : श्वासास अडथळा येऊ नये यासाठी कपाळाखाली टॉवेलची घडी ठेवावी किंवा मान एका बाजूला वळवावी.

  • उजव्या कुशीवर झोपणे : उठून पाठीवर मागे रेलून बसणे. अशा पध्दतीने बसताना पाठीला आवश्‍यक आधार द्यावा.

  • डाव्या कुशीवर झोपणे : आणि पुन्हा पालथे पोटावर झोपणे.

  • हे करत असताना ऑक्‍सिजन पातळी मोजत जावी. या साध्या वाटणाऱ्या झोपण्याच्या प्रकारांमुळे ऑक्‍सिजनची पातळी राखण्यास मदत होते. मात्र म्हणजे हा प्रकार व्हेंटिलेटरला पर्याय आहे, असे नव्हे.

गुंतागुंत ओळखणाऱ्या रक्ताच्या तपासण्या

डॉक्‍टरांच्या सल्ल्याने रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण, डी डायमर, सी आर पी, एल डी एच अशा तपासण्या केल्याने संसर्गाची तीव्रता लवकर ओळखण्यास मदत होते. त्यानुसार रुग्णास वेळेत भरती करता येते. छातीचा एक्‍स रे, सीटी स्कॅनमुळेही संसर्ग तीव्रता वेळेमध्ये कळण्यास मदत होते.

उपचार पद्धती व औषधे

कोविड रुग्णाच्या उपचारासाठी आयवरमेक्‍टिन, डॉक्‍सीसायक्‍लीन, फॅविपिराविर , डेक्‍सामिथॅसोन, रेमडेसिविर, टोसिलोझुमॅब, प्लाझ्मा अशा अनेक औषधांचा वापर केला जातो. यातील कोणतीही उपचार पध्दती ही या आजारावरील रामबाण उपाय नाही. रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार आणि गरजेनुसार योग्य ती उपचार पध्दती देण्यात येते. कोणती औषधे घ्यावीत, याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेणे आवश्‍यक आहे

कोविड उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार सुविधा

कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात तीन स्तरीय रचना उभी करण्यात आलेली आहे.

  • कोविड केअर सेंटर : तालुका पातळीपासून ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यभरात अशी दोन हजाराहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये सौम्य स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो.

  • कोविड हेल्थ सेंटर : या केंद्रांमध्ये मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो. काही ऑक्‍सिजन बेड्‌स देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध असतात. तालुका आणि जिल्हा पातळीवर ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यात अशी सोळाशेहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.

  • कोविड हॉस्पिटल : गंभीर स्वरुपाच्या रुग्णांसाठी ही केंद्रे कार्यरत आहेत. इथे ऑक्‍सिजन बेडस, व्हेंटिलेटर्स आणि अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध आहे. राज्यात सुमारे 950 कोविड हॉस्पिटल्स कार्यरत आहेत.

कोणत्या कोविड रुग्णास भरती होणे आवश्‍यक आहे?

  • ज्याचे वय 50 पेक्षा अधिक आहे आणि ज्याला काही जोखमीचे आजार आहेत

  • ज्याचा आजार सौम्य स्वरुपाचा आहे पण घरात पुरेशी जागा नाही

  • ज्यांचे ऑक्‍सिजनचे प्रमाण 93 पेक्षा कमी आहे

  • 6 मिनिटे वॉक टेस्टनंतर ज्यांना धाप लागते किंवा ऑक्‍सिजन 93 पेक्षा कमी होतो.

  • ज्यांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचा न्युमोनिया आहे

  • ज्यांना सतत तीव्र ताप आहे

  • रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाडाच्या खुणा

कोविड कसा होतो, कसा पसरतो, तो टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि कोरोना झाला तर काय करायला हवे, निदान, उपचार सुविधा कुठे आहेत, याची पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार वागणे आवश्‍यक आहे. आजच्या संकटाच्या प्रसंगी छोटी छोटी वाटणारी माहिती हे संकट नाहीसे करण्यासाठी अत्यावश्‍यक आहे.

- डॉ. प्रदीप आवटे,

राज्य सर्वेक्षण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT