Lok Sabha Election 2024  SAkal
सोलापूर

Lok Sabha Election 2024 : विरोधी लाटेबरोबरच भाजप विविध प्रश्‍नांच्या घेऱ्यात

उमेदवारीवरच भवितव्य; ओबीसींच्या मतांचे ध्रुवीकरण शक्य

अभय दिवाणजी

सोलापूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील उभी फूट तसेच कमकुवत काँग्रेस भाजपच्या दृष्टीने फायदेशीर असली तरी केंद्र व राज्य सरकाराविरोधातील लाट, आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधात गेलेला मराठा समाज, विद्यमान खासदारांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या घोळामुळे पक्षप्रतिमेला बसलेला धक्का हे भाजपच्या दृष्टीने तोट्याचे ठरणारे असल्याचे सध्याचे चित्र आहे.

तरीही उमेदवारीच्या निवडीनंतरच चित्र स्पष्ट होण्याची वाट पहावी लागणार आहे. तसेच ओबीसींच्या मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव उमेदवार म्हणून जवळपास निश्‍चित झाले आहे.

त्यांनी प्रचाराच्यादृष्टीने मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवातही केली आहे. अद्यापतरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा घोळ अद्यापतरी मिटला नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे.

माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, उत्तम जानकर, माजी नगरसेविका संगीता जाधव, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, माजी खासदार ॲड. शरद बनसोडे, मोहोळचे नागनाथ व संजय क्षीरसागर, कोमल ढोबळे, दिलीप शिंदे अशा नावांची चर्चा आहे.

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी परंतु धक्कादायक उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा मनसुबा आहे. ही जागा महायुतीतील रामदास आठवले गटाच्या रिपाइंला सुटल्यास पक्षाचे सरचिटणीस राजा सरवदे यांचा विचार होऊ शकतो.

गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात बाजी मारली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. महास्वामी व वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली. यावेळी मोदी लाटेपेक्षा डॉ. आंबेडकरांनी घेतलेल्या एक लाख ७० हजार सात मतांमुळे भाजपचा उमेदवार एक लाख ५८ हजार ६०८ मतांनी विजयी होऊ शकल्याचे सत्य नाकारता येत नाही.

विकास कामांचा धडाका

अक्कलकोट, मंगळवेढा-पंढरपूर, दक्षिण सोलापूर व शहर उत्तर या सत्ताधाऱ्यांच्या विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींच्या विकास कामांच्या भूमिपूजनातून लोकप्रतिनिधींची प्रचंड धडपड सुरु आहे. रस्ते विकास, सिंचन योजना तसेच धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून विविध कामांचा धडाका सध्या सुरु आहे.

नाराजीचा सूर

शहर मध्य मतदारसंघावर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या रुपाने काँग्रेसचे अस्तित्व आहे. सध्या मतदारसंघातील एकूण सहापैकी पाच मतदारसंघावर भाजप व आघाडीचे वर्चस्व असल्याचे वरवर पाहता दिसत असले तरी एका सहयोगी सदस्यासह सहा आमदार व दोन खासदार असलेल्या भाजपने सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याची नाराजी, स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा,

गारमेंट हब, टेक्स्टाईल उद्योगाकडे दुर्लक्ष, उडान योजनेत असूनही सोलापूरची अधांतरी विमानसेवा याबाबींमुळे वाढलेल्या नाराजीला कसे थोपवावे, हा प्रश्‍न उभा राहणार आहे. होटगी रस्त्यावरील विमानतळावरुन विमान उडविण्यास अडथळा ठरलेली सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविल्‍यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी भोवण्याची शक्यता आहे. विविध तांत्रिक बाबींमुळे होटगी रस्त्यावरील विमानतळावरुन विमानसेवा सुरु झाली नाही. ही सेवा सुरु झाल्यास तरुणाई भाजपकडे वळेल, यात शंका नाही.

लक्ष्यवेधी...

  • गेटकेन उमेदवारास विरोध

  • तरुण चेहऱ्यास संधी देण्याची गरज

  • तिसरी आघाडी भाजपला फायदेशीर

  • चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे थेट वर्चस्व

  • मोहोळमध्ये अजितदादा गटाचा आमदार

२०१९ चा निवडणूक निकाल

  • डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी (भाजप) - ५,२४,९८५

  • सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) - ३,६६,३७७

  • प्रकाश आंबेडकर (वंचित आघाडी) - १,७०,००७

  • बहुमताची आघाडी -१,५८,६०८

  • एकूण मतदान - १०,८४,५१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT