अकलूज : माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात आज अकलूज येथील ‘शिवरत्न’ या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि या तीन मतदारसंघातील स्ट्रॅटेजीबाबत चर्चा झाली. तसेच या नेत्यांनी एकत्र ‘स्नेह भोजन’ केले. या डिनर डिप्लोमसीच्या निमित्ताने पवार, शिंदे आणि मोहिते पाटील हे राज्यातील तीन दिग्गज नेते अनेक वर्षांनंतर एक आले होते.
काल सकाळी हेलिकॉप्टरमधून शरद पवार यांचे अकलूज येथे आगमन झाले. यावेळी मोहिते-पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरलेली होती. त्यातूनच कार्यकर्त्यांनी मोहिते-पाटील यांना तुतारी हाती घेण्याचा आग्रह केला.
त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. अखेर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज (ता. १४) ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्नेहभोजनानिमित्त विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शिवरत्नला भेट दिली.
शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शिवरत्नवर स्वागत केले. त्यानंतर या नेत्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील व इतर नेत्यांसमवेत चर्चा केली. यावेळी माढा, सोलापूर, बारामती या लोकसभा मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मोहिते पाटील गटाची सोलापूर, माढा मतदारसंघात ताकद आहेत. याशिवाय बारामतीत मोहिते-पाटील यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश या तीन मतदारसंघात परिणाम करेल, असे राजकीय जाणकारांना वाटते.
शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्नेहभोजनाला सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासह माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, माण-खटाव, फलटण तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे २००९ नंतर निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच ‘शिवरत्न’वर आले होते. विजयसिंह मोहिते पाटील हे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ती पहिली वेळ होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.