मंगळवेढा - हजरत महम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भर पावसात शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत निळा, भगवा आणि हिरवा झेंडा हातात घेत तरुणाईंनी जल्लोष केला. जयंतीनिमित्त पुन्हा एकदा धार्मिक एकोप्याचे दर्शन घडले, सर्वधर्म समभावाची जोपासण्याची परंपरा कायम राहिल्याचे दिसून आले.
28 ऑगस्ट रोजी असलेली पैगंबर जयंती गणेश विसर्जन मिरवणूकीतील गर्दीमुळे शहरातील मुस्लिम बांधवांनी सामजंस्य भूमिका घेत दोन दिवस उशिरा साजरी करण्याचा निर्णय आ. समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत घेतला.
त्यामध्ये हिंदू सणातील नवरात्र महोत्सव मुस्लिम बांधवाकडे तर मुस्लिम सणांची जबाबदारी हिंदू बांधवाकडे हा धार्मिक एकोपा संपूर्ण राज्याला आदर्श देणारा असला तरी तोच एकोपा पैगंबर जयंतीच्या निमित्ताने दिसूनच आला. मिरवणूकीत शहरातील 9 पेक्षा अधिक मोहल्यांनी यात सहभाग नोंदवला.
चार वाजता गैबीपीर दर्गा पासून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सांगली व कर्नाटक या भागातील नामवंत बँड, डीजे, घोडे, उंट, यांचा सहभाग होता. त्याचबरोबर अफताब यंग सर्कलने या मिरवणुकीत पाणी आडवा पाणी जिरवा, रक्तदान हे जीवदान, सायकल वापरा इंधन वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, हेल्मेट वापरा जीवितहानी टाळा,असे प्रबोधनाचे संदेश देखील दिले.
गैबीपीर दर्गापासून सुरू झालेली मिरवणूक ही शनिवार पेठ, मुरलीधर चौक, चोखामेळा चौक, शिवप्रेमी चौक, मुलाणी गल्ली, खंडोबा गल्ली, सुतार गल्ली, बोराळ नाका, काझी गल्ली या मार्गावरून गैबी पीर दर्गा येथे फातेहखाणी झाली. गैबीपीर यंग सर्कलच्या वतीने महाप्रसाद वाटप करून समारोप झाला.
या मिरवणुकी दरम्यान शनिवार पेठ येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी सरबत वाटप केले, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शिवप्रेमी चौकात तर घुले गल्ली परिसरात माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी खाऊ वाटप केले.
मिरवणुकी दरम्यान मुस्लिम बांधवांनी जय भीम, छत्रपती शिवरायांचा भगवा, व हिरवा झेंडा असे तिन्ही झेंडे एकत्र दिमाकांत फडकवले. त्यामुळे नवरात्र आणि गैबीपीर उरूसात असलेला हा धार्मिक एकोपा या जयंतीत देखील दिसून आला. भर पावसात निघालेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.