सोलापूर : सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनच्या संचालकांनी व प्रभारी व्यवस्थापकाने संगनमत करून संस्थेची जागा शासकीय मूल्यांकनाशिवाय विकली. त्या जागेवरील इमारत पाडली, सभासदांना बेकायदेशीरपणे भागभांडवलातील रक्कम वाटली, प्रभारी व्यवस्थापकाला पगाराशिवाय जादा रक्कम दिली असे कारनामे संगनमताने केल्याप्रकरणी संस्थेच्या १४ पदाधिकाऱ्यांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात माजी नगरसेवकाचाही समावेश असून सर्वांनी मिळून २४ कोटी ३३ लाख ८६ हजार २० रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद विशेष लेखापरीक्षक बप्पाजी पवार यांनी पोलिसांत दिली आहे.
सोलापुरातील भद्रावती कॉम्प्लेक्स परिसरात सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरशेनचे कार्यालय आहे. संस्थेचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी विशेष लेखापरीक्षक बप्पाजी पवार यांच्याकडे होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळात केलेले व्यवहार पाहून त्यांनाही धक्काच बसला. अपहारप्रकरणी संस्थेचे चेअरमन अविनाश बोमड्याल, संचालक सहदेव मणमंतु इप्पलपल्ली, श्रीहरी रामण्णा विडप, संजय भुमय्या कोंडा, मनोहर पापय्या इगे, यादगिरी बालय्या वड्डेपल्ली, सर्वेशाम शंकरराव येमूल, श्रीहरी हणमय्या इराबत्ती, व्यंकटेश बालाजी बोगा, लक्ष्मीनारायण शंकर देवसानी, वेणुगोपाळ केशव अंकम, कल्पना श्रीधर रापोल, मंगम्माबाई कृष्णाहरी आडम व प्रभारी व्यवस्थापक रामचंद्र सामलेटी या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम घाडगे तपास करीत आहेत.
विणकर फेडरेशनमध्ये ‘असा’ झाला अपहार
न्यू पाच्छा पेठेतील संस्थेच्या ८१०० स्क्वेअर मीटर जागेचे २०१५ मध्ये २८.३२ कोटी शासकीय मूल्यांकन होते, तरीसुद्धा ऑगस्ट २०२१ मध्ये ही जागा १४ कोटी रुपयास विकली.
संस्थेच्या जागेत संस्थेची इमारत बांधलेली होती, २०१५ मध्ये इमारत पाडकामानंतर संस्थेला एक कोटी ४१ लाख ७८ हजार २० रुपये मिळतील असे मूल्यांकन झाले होते, पण पाडकामानंतर संस्थेत काहीच रक्कम भरली नाही.
२०१५ मध्ये संस्थेचे १६० सभासद होते. नफा किंवा लाभांश सभासदांना वाटता येत असतानाही ८ कोटी ४२ लाख सात हजार रुपये संस्थेच्या भागभांडवलातून वाटले.
संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक रामचंद्र बालराज सामलेटी यांना नियमित पगार देऊनही संस्थेकडे त्यांची काहीही रक्कम येणे बाकी नसतानाही त्यांना पाच टप्प्यात धनादेशाद्वारे दोन लाख ७५ हजार रुपये जादा दिले.
११ जुलै २०१४ रोजी संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक सामलेटी व तत्कालीन अध्यक्षांनी दत्तात्रय लक्ष्मीनारायण गोटीपामूल यांच्यासोबत १६.१० कोटी रुपयास संस्थेच्या जागेचा व्यवहार केला. पण व्यवहार रद्द केल्याने त्यांच्याकडून घेतलेला पाच लाख रुपयांचा इसारा परत करण्यासाठी विहीर बुजविणे, मुरूम टाकणे अशी कामे दाखवून गोटीपामूल यांना पैसे दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.