मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुमारे 90 दिवसाच्या कालावधीत अकरा लाख 90 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.
मोहोळ - मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुमारे 90 दिवसाच्या कालावधीत अकरा लाख 90 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन नऊ लाख 28 हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. उपपदार्थ निर्मितीच्या माध्यमातून सहा कोटी 60 लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे. अद्यापही 9 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाविना शिवारात उभा असून, फेब्रुवारी अखेर पर्यंत त्या सर्व उसाचे गाळप होणार आहे. दरम्यान ऊस तोडणी मजुरांच्या पैसे मागण्यामुळे, तसेच यंत्राद्वारे ही ऊस तोडणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांनाही पैसे मागणे, ट्रॅक्टर चालकाला जेवण व एन्ट्री यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
आष्टी तलाव, उजनी कालवा, सीना व भोगावती नद्या या पाणी स्त्रोतामुळे तालुक्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यातील भीमा, आष्टी शुगर, लोकनेते, व जकराया या चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आली आहे. मात्र ऊस लागवड करून गाळपास योग्य होई पर्यंत जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास ऊस गाळपास पाठविताना होतो. त्यामुळे शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. ऊस लावून त्रास सहन करण्यापेक्षा शेतकरी आता पेरू, सिताफळ, द्राक्ष, डाळिंब या फळबागा लागवडी कडे वळला आहे.
चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने जेवढी उसाची वाढ व्हावयास पाहिजे होती तेवढी झाली नाही. त्यामुळे ऊस वाढला नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. एकरी 50 ते 60 टन निघणारा ऊस केवळ 35 ते 40 टनावर आला आहे. बचार व खोडवा ऊस एकरी 15 ते 20 टनावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
चालू गळीत हंगामात अनगर येथील लोकनेते कारखान्याने गाळप, साखर उत्पादन, वीज निर्मिती व सरासरीत बाजी मारली आहे. तर दर देण्यात आष्टी येथील आष्टी शुगर या साखर कारखान्याने बाजी मारली आहे.
लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार, कारखान्याने आज तागायत तीन लाख 89 हजार मेट्रीक टनाचे गाळप करून, तीन लाख 89 हजार 600 पोती साखर उत्पादित केली आहे. तर सरासरी उतारा 10.6 इतका मिळाला आहे. साखर कारखान्याने आज पर्यंत 3 कोटी आठ लाख युनिट विजेची निर्मिती केली आहे.
अद्यापही 2 लाख 50 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना शिवारात उभा आहे.आष्टी येथील आष्टी शुगर कारखान्याच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार, कारखान्याने चालू गळीत हंगामात 3 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करून 2 लाख 45 हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 8.38 इतका मिळाला आहे. साखर कारखान्याने एक कोटी युनिट विजेची निर्मिती केली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्यापही दोन लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे. या कारखान्याने दर देण्यात आघाडी घेतली आहे.
टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिलेल्या माहिती नुसार, कारखान्याने चालू गळीत हंगामात 2 लाख 50 हजार मेट्रिक टनाचे गाळप करून एक लाख 93 हजार 500 पोती साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 8.22 इतका मिळाला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्यापही दोन लाख 50 हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने एक कोटी युनिट वीज निर्मिती केली आहे. खा धनंजय महाडिक व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने कारखाना सुरळीत सुरू आहे.
वटवटे ता मोहोळ येथील जकराया शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार, कारखान्याने चालू गळीत हंगामात 2 लाख 50 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक लाख पोती साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा 9.50 इतका मिळाला आहे. कार्यक्षेत्रात अद्यापही दोन लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. या कारखान्याने थेट उसाच्या रसापासून 80 लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे, व ते विक्री केली आहे. त्या माध्यमातून कारखान्याला 35 कोटी रुपये मिळाल्याचे जाधव यांनी सांगितले. कारखान्याने एक कोटी 47 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे.
चालू गळीत हंगामात उसातील "सुपारी" च्या वेलाने शेतकऱ्यांना मोठे अडचणीत आणले आहे. ऊस तोडणी मजूर फड तोडण्या अगोदर उसाचा फड फिरून पाहतात व वेल आहेत आम्ही तोडत नाही असे त्या उसाच्या मालकाला सांगतात. शेवटी ऊस कसा तरी कारखान्याला घालवायचा म्हणून आर्थिक तडजोड करून ऊस तोडला जातो. ऊस भरून जाताना त्या ट्रॅक्टर चालकाला 200 रुपये एंट्री व जेवण द्यावे लागते. याचा नाहक भुर्दंड विनाकारण शेतकऱ्यांना बसतो.
काही कारखाने ऊस क्षेत्र जवळ असल्याने बैलगाडी द्वारे ऊस वाहतूक करतात. बैलगाडी वाहनांना पैसे तर द्यावे लागतातच परंतु बैलगाडी फडात भरल्यानंतर ट्रॅक्टर बोलवा व बैलगाडी बाहेर काढून द्या असा तगादा शेतकऱ्याकडे लावतात. एक ट्रॅक्टर एक बैलगाडी बाहेर काढण्यासाठी 200 ते 300 रुपये घेतो. चालू वर्षी ही नवीनच पद्धत बैलगाडी वाहनांनी सुरू केली आहे. ऊस तोडणी यंत्राची परिस्थिती या हून वेगळी नाही. एका यंत्राबरोबर पाच ते सात माणसे असतात. त्या सर्वांना जेवण व एकरी काय ठरेल ती रक्कम द्यावी लागते. या सर्व त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. "भीक नको पण कुत्र आवर" अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. मात्र कारखाना प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नाही.
प्रतिक्रीया -
शेतकऱ्यांचे एकरी टने ज वाढले पाहिजे यासाठी शेतकरी मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना तज्ञा मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. एकरी टने ज वाढल्या शिवाय कारखान्याला भरपूर ऊस पुरवठा होणार नाही व शेतकऱ्यांनाही चांगले अर्थार्जन होणार नाही. त्यामुळे हंगाम संपताच शेतकरी मेळाव्यास प्रारंभ करणार असल्याचे आष्टी शुगरच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.