जर केंद्राची भूमिका स्पष्ट झाल्यास मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्याकडून सुरू असलेली टोलवाटोलवी दूर होण्यास मदत होणार आहे, असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे, याकरिता रविवारच्या (ता. 4) मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, मात्र ती अद्याप मिळालेली नाही. परवानगी मिळो अथवा ना मिळो, आम्ही कोरोना (Covid-19) प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मोर्चा काढणारच, अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मोर्चाचे नेतृत्व करणारे नरेंद्र पाटील (Narendra Patil) शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. (Narendra Patil expressed a clear decision to hold a morcha on Sunday for Maratha reservation)
नरेंद्र पाटील म्हणाले, रविवारी (ता. 4) सकाळी 11 वाजता पुणे रोडवरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. यामध्ये समाजबांधवासंह सर्वपक्षीयांचा सहभाग राहणार आहे. कोरोना आपत्तीमुळे गतवेळच्या मोर्चाच्या तुलनेत यंदा कमी प्रतिसाद मिळणार आहे. सोलापुरातून जरी या आंदोलनाची सुरवात होणार असली तरी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून देखील आंदोलन होणार आहे.
यांना दिले निमंत्रण
या आंदोलनासाठी आम्ही छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना आमंत्रित केले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची यासंदर्भात भेट घेतली. काही लोक या मोर्चाला राजकीय रंग देऊ पाहात आहेत, पण हा मोर्चा सर्वपक्षीय आहे. राज्यात सत्ता कोणाचीही असो, आंदोलनाचा पवित्रा कायम राहणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट
मराठा आरक्षण प्रश्नी केंद्रीय कायदेमंत्र्यांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत. 102 व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्राने संसदेत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी आम्ही करणार आहोत. जर केंद्राची भूमिका स्पष्ट झाल्यास मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्याकडून सुरू असलेली टोलवाटोलवी दूर होण्यास मदत होणार आहे, असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने नवीन आयोग नेमावा
केंद्र शासनाने राज्याने नेमलेली गायकवाड समिती बरखास्त केली आहे म्हणून मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने नवीन मागासवर्गीय आयोग नेमून सर्व्हे करावा. अन्य राज्यांनी अतिरिक्त वा वाढीव आरक्षणाबाबत केंद्राकडे परवानगी घेतली म्हणून त्यांच्या राज्यातील आरक्षण अबाधित आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील अशी परवानगी घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
9 सप्टेंबर व 5 मेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रमावस्था आहे. शरद पवारांचा उल्लेख दि ग्रेट मराठा असा नेहमीच केला जातो. हे लक्षात घेता मराठा आरक्षणाबाबतचा खुलासा खुद्द शरद पवारांनीच करावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केली.
संभाजीराजेंचे "ते' कौतुक पटले नाही
मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात संभाजीराजे पाठीशी का नाहीत, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता, पाटील म्हणाले, पूर्वी आंदोलनाबाबतच्या प्रक्रियेत ते सामील होते. पण आता आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे केलेले कौतुक मला पटले नाही. आरक्षण मिळावे व यासंदर्भातील सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
... तर प्लॅन बी आखणार
मोर्चासाठी आम्ही पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, पण अद्याप परवानगी मिळाली नाही. मोर्चा काढण्याबाबत "प्लॅन ए' तयार आहे, पण परवानगी न मिळाल्यास "प्लॅन बी' ठरवणार, असे सांगतानाच पाटील यांनी "प्लॅन बी'विषयी तपशील देण्यास जाणीवपूर्वक टाळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.