अकमल अफसर शेख याने अभ्यासाचा तोल सांभाळत राष्ट्रीय खेळाडू म्हणून स्थान मिळवले आहे.
सोलापूर: इयत्ता तिसरीत असताना बास्केटबॉलची बास्केट त्याच्यापेक्षा कितीतरी उंच असली तरी त्याने दोनवर्षातच बास्केटमध्ये बॉल टाकण्यास सुरुवात केली. आज अकरावीला असताना बेगमपेठ येथील अकमल अफसर शेख याने अभ्यासाचा तोल सांभाळत राष्ट्रीय खेळाडू म्हणून स्थान मिळवले आहे.
अकमल याचे वडील अफसर शेख हे स्वतः कराटेपटू आहेत. घरात खेळाचे वातावरण पहिल्यापासून होतेच. अकमल हा तिसरीला असताना वडिलांनी त्याला स्पोर्टस क्लबमध्ये दाखल केले. इनडोअर स्टेडियममध्ये गेल्यानंतर ग्रीनस्टार स्पोर्टस क्लबचे कोच माजीद खान-पठाण व तलहा शेख या प्रशिक्षकांनी त्याला प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. सुरवातीला लहानग्या अकमलला उंच बास्केटपर्यंत बॉल पोहोचवता येत नव्हता. तरीही त्याने सरावाला सुरवात केली. बास्केट बॉल खेळाच्या प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम व खेळाचा सराव हे दोन वेगळे भाग शिकावे लागतात. त्यानुसार अकमलने सराव सुरू केला. सकाळ व संध्याकाळ तो मैदानावर नियमित सराव करत होता. दोन वर्षांनी तो पाचवीला असताना त्याला बास्केटमध्ये बॉल टाकता येऊ लागला.
अभ्यासात देखील त्याने नेहमीचा पहिला क्रमांक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश येत गेले. अभ्यास व खेळाचे संतुलन तो अगदी प्राथमिक शिक्षणापासून करत राहिला. त्यामुळे त्याला कोणतीही अडचण पडली नाही. पालकांची देखील मर्जी कायम राहिली. परीक्षा आली की काही दिवस खेळण्याचा सराव थांबवायचा व परीक्षा संपून सुट्टी लागली की पुन्हा सराव वाढवायचा असा शिरस्ता त्याने कायम बाळगला. शाळास्तरावरील स्पर्धातून त्याला चांगल्या संधी मिळत गेल्या. शालेय स्पर्धांमध्ये त्याने सुरवातीला शाळा, शहर, जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यास सुरवात केली. अंडर 14 मध्ये त्याने सुरवातीला प्रतिनिधीत्व केले.
पहिल्याच स्पर्धेत त्याला उत्कृष्ट शूटर म्हणून बक्षीस मिळाले. नंतर त्याने पुन्हा अंडर 14 स्पर्धेत उतरला. छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली. मागीलवर्षी त्याने दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अंडर 17 च्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व केले. अकमल हा सध्या अकरावीत वाणिज्य शाखेत शिकतो आहे. सकाळी दोन तास व सायंकाळी तीन तास खेळाच्या सरावासाठी देतो आहे.
ठळक बाबी
- इयत्ता तिसरीपासून बास्केट बॉलच्या मैदानात
- अभ्यास व खेळाचा सराव दोन्हीमध्ये संतुलन
- लहानपणीच स्पोर्टस क्लबमध्ये सहभाग
- अकरावीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत मिळाले स्थान
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे ध्येय आहे. तसेच खेलो इंडिया व इतर स्पर्धात देखील चांगली कामगिरी करावयाची आहे.
- अकमल शेख, राष्ट्रीय बास्केट बॉलपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.