माढ्याचे पहिले खासदार म्हणून शरद पवारांची ओळख आहे. २०१९ ला हातातून गेलेला माढा ताब्यात घेण्यासाठी सध्या शरद पवार शांत दिसत आहेत.
सोलापूर : शरद पवार (Sharad Pawar) सप्टेंबर २०१९ मध्ये सोलापुरात म्हणाले, मी काय म्हातारा झालोय का?, अजून लय लोकांना घरी बसवायचंय, पवारांचे ते वाक्य आणि महाराष्ट्रात काहीच महिन्यांमध्ये झालेला महाविकासचा प्रयोग देशाने पाहिला.
आता पवार बीडमध्ये म्हणाले, माझं वयं झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलंय, २०२४ ची लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पवारांच्या डोक्यात काय?, २०२४ मध्ये पवार नक्की काय दाखविणार? याचा कसलाही अंदाज ना इच्छुकांचा लागतोय ना सामान्य जनतेला.
शरद पवार कधीही आणि काहीही करू शकत असल्याचा अनुभव असल्याने या ८३ वर्षांच्या योद्ध्याची धास्ती दिसत आहे. १९६५ ते आजपर्यंत शरद पवार आणि सोलापूरची नाळ कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या वाडी-वस्तीवर कोणाची चलती आहे, कोण किती कामाचा अन् बिनकामाचा आहे? याची पक्की माहिती पवारांकडे असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात ही धास्ती तर अधिकच जाणवते.
युवक काँग्रेसचे सरचिटणीस, सोलापूरचे पालकमंत्री, सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे खासदार, अशा एक ना अनेक रूपात सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांना पाहिले व अनुभवले आहे. सत्ता असो वा नसो, सोलापूरवर आलेल्या संकटांमध्ये, येथील सुख: दुःखामध्ये शरद पवार नेहमीच धावून येतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ठ्रवादीचे दोन व पुरस्कृत एक असे तीनही आमदार सहभागी झाले आहेत.
शरद पवारांकडे सध्या ना माजी आमदार राहिले, ना विद्यमान आमदार. शरद पवारांना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील सेकंड लाईन चांगली माहिती आहे. कोणत्या जातीचे कुठे प्राबल्य आहे?, कोणाला कुठे संधी दिली तर डाव जिंकता येईल याची खडान्खडा माहिती स्वत: पवारांकडे आहे. शरद पवार येवला (जि. नाशिक) आणि बीडप्रमाणे सभा घेत घेत आपल्याकडे आले तर आपले पण अवघड होईल, याची धास्ती आता जिल्ह्यातील दिग्गजांमध्ये वाटू लागली आहे.
शरद पवार यांच्या सत्तेच्या पंगतीत आजपर्यंत जिल्ह्यातील प्रस्थापित घरातीलच मंडळी जेवायला बसली होती. आता पवारांकडील पंगत रिकामी झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या पंगतीत बसण्याची संधी दिसू लागल्याने आतापर्यंत अडगळीत असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांच्या नातवांना, झेडपीच्या माजी पदाधिकाऱ्यांना २०२४ मधील मौका दिसू लागला आहे. सध्या शरद पवार यांच्या मर्जीत असलेल्या जिल्ह्यातील नव्या नेत्यांसोबत ते बारामतीशी सलगी वाढविण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.
भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते आणि कोणासोबतही जाऊ शकते, उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत जाणे म्हणजे शरद पवारांचीच गेम आहे, अशा गोंधळलेल्या जनमानसात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसबद्दल लोक सध्या चांगलं बोलू लागले आहेत. काँग्रेस आणि ठाकरे सेना यांनी खूप काही चांगले केले म्हणून त्यांच्याबद्दल लोक त्यांच्याबद्दल चांगले बोलत नसावेत.
भाजपने सत्तेसाठी तडजोडी व फोडाफोडी केल्याने त्यांच्यापेक्षा हे बरे म्हणून बोलत असावेत. काँग्रेस व ठाकरे सेनेकडे जरी सध्या सहानुभूती आणि विश्वासार्हता असली तरीही त्या मतांचे रूपांतर विजयात करण्यासाठी आवश्यक असलेली रणनीती अन् उमेदवार मात्र शरद पवारांच्याच डोक्यात आहे. त्यामुळे हे तिघे किती दिवस एकत्रित राहतात? यावर आगामी निकाल अवलंबून असल्याचे दिसते.
माढ्याचे पहिले खासदार म्हणून शरद पवारांची ओळख आहे. २०१९ ला हातातून गेलेला माढा ताब्यात घेण्यासाठी सध्या शरद पवार शांत दिसत आहेत. माढ्यात सोलापूरचे चार (माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा) व साताऱ्याचे दोन (फलटण व माण) विधानसभा मतदार संघ येतात. माढ्याची खासदारकी सध्या फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या रूपाने भाजपकडे आहे.
२०२४ साठी माढ्याच्या खासदारकीचे प्रमुख उमेदवार म्हणून फलटणमधील खासदार निंबाळकर किंवा संजीवराजे नाईक-निंबाळकर समोर येऊ शकतात. शुक्रवारी (ता.२५) कोल्हापुरात जाहीर सभा असताना पवारांनी त्या दिवशी सकाळचा वेळ दहिवडीसाठी (ता. माण) दिला आहे. इमारतींचे लोकार्पण करण्यासोबतच पवार कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहे. २०२४ ला माढा ताब्यात घेण्याची सुरवात पवारांनी दहिवडीतून केल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.