गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने हाहाःकार माजविला आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात 617 बालके अनाथ झाली आहेत.
सोलापूर : गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना (Covid-19) महामारीने हाहाःकार माजविला आहे. या काळात सोलापूर (Solapur) जिल्ह्यात 617 बालके अनाथ (Orphans) झाली आहेत. यातील काहीजणांचे मातृछत्र तर बहुतांशांचे पितृछत्र हरपले आहे. अशा अनाथांच्या संगोपनाचा, शिक्षणाचा तसेच पुनर्वसनाचा (Rehabilitation) मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनाथांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुस्थितीत असलेल्या सहकारी पतसंस्थांनी, सामाजिक संस्थांनी तसेच उद्योजकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले तर सोलापूर जिल्हा राज्यभरासाठीच नव्हे देशात आदर्श निर्माण करणारा पहिला जिल्हा असेल.
गेल्यावर्षी मार्चपासून राज्यभरात लॉकडाउन सुरू झाला. सोलापुरात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरोनाने संपूर्ण जिल्हाभरात कहर माजविला. सोलापूर ग्रामीण भागात आजही त्याचा उद्रेक होत आहेच. कोरोनाच्या एंट्रीपासून आजपर्यंत सोलापूर शहरात 28 हजार 987 रुग्ण झाले असून एक हजार 435 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात एक लाख 50 हजार 585 रुग्ण असून तीन हजार 158 जणांचा मृत्यू झाला आहे. शहर व जिल्हा मिळून आतापर्यंत एक लाख 79 हजार 572 रुग्ण तर चार हजार 593 जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या 625 रुग्णांपैकी 89 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील कोरोनाचा कहर आता काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. तरीही तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील 202 महिलांवर निराधार होण्याची वेळ आली आहे. तर जिल्ह्यातील 697 बालकांचे छत्र हरपले असून त्यातील 74 बालकांचे मातृछत्र तर 623 बालकांचे पितृछत्र हरपले आहे. मातृ-पितृ असे दोन्ही छत्र हरपलेल्या मुलांची संख्या 32 आहे. बालसंगोपन व महिलांच्या पुनर्वसनासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी व महिलांना काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात आले आहे. परंतु शासन पातळीवरील प्रयत्नांपेक्षा सामाजिक भावनेने खासगी संस्थांनी केलेले काम कैकपटीने दर्जात्मक असते. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था, सामाजिक संस्था आणि उद्योजकांनी अनाथ झालेल्या एका बालकास दत्तक घेतले तर त्याचे संगोपन, शिक्षण आणि भविष्य मार्गी लागणे सुकर होणार आहे. यासाठी पुढाकाराची गरज आहे.
कोरोनाकाळात मातृ-पितृछत्र हरपलेल्या बालकांसाठी सोलापुरात शासकीय जागांचा शोध घेऊन वसतिगृह उभारण्यात यावे. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार देण्यासाठीही शासकीय वसतिगृहांची निर्मिती करण्याची गरज आहे. या निराधार बालकांना व महिलांना मानसिक बळ देण्याची ही वेळ आहे. बालकांना आरटीई लागू असलेल्या खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची योजना करणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची एक समिती नेमली तर उत्तमच होईल.
लाभांशातून होईल मोठी मदत
सोलापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजक आपल्या सीएसआरमधून (सामाजिक उत्तरदायित्त्व) निराधार बालकांना दत्तक घेऊ शकतील. तसेच सोलापूर जिल्ह्यात एक हजार 18 सुस्थितीतील सहकारी पतसंस्था आहेत. जवळपास 25 हजार कोटींची उलाढाल या संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी होत असते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या (नोकरदारांच्या) 330 पतसंस्था आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच वसुलीचे हप्ते घेतले जात असल्याने या संस्थांची स्थिती उत्तम असून या सर्व संस्थांचा ऑडिट वर्ग "अ' आहे. दरवर्षी या संस्थांकडून सभासदांना दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत लाभांशाचे वाटप केले जाते. सोलापुरातील भारतरत्न विश्वेश्वरैया अभियंता सहकारी पतसंस्थेने आपल्या लाभांशाच्या हिश्श्यातील योगदानातून "सकाळ'च्या माध्यमातून सांगली पूरग्रस्तांसाठी चादरी, बेटी बचाव, बेटी पढाओसाठी 21 हजार, कोरोनाग्रस्तांसाठी 50 हजारांचा निधी देऊन सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे. हा आदर्श घेऊन सुस्थितीतील पतसंस्थांनी आपल्या लाभांशातील एक किंवा अर्धा टक्काही हिस्सा काढून या बालकांच्या संगोपनासाठी वापरला तर एक नवा पायंडा पाडल्यासारखे होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.