अकलूज (सोलापूर) : निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक असणारा पक्षी म्हणजे घुबड. जनसामान्यात अनेक भीतिदायक गैरसमज असणारा हा पक्षी कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झाला. या पक्ष्यास जखमी अवस्थेत पाहून त्यास पक्षी निरीक्षकाकडे पोचवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा तसेच त्यावर उपचार करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडणाऱ्या पक्षी निरीक्षकाचे अकलूजकरांकडून कौतुक केले जात आहे.
अकलूज येथील मसूदमळा परिसरात कावळे आणि गव्हाणी घुबड यांच्या धुमश्चक्रीत एक घुबड जखमी झाले होते. याच परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक नारायण घुले यांनी या घाबरलेल्या व जखमी अवस्थेत पडलेल्या घुबडाला संरक्षण देत विनाविलंब डॉ. अरविंद कुंभार यांना कळविले. डॉ. कुंभार यांनी या घुबडाला प्रथमोपचार करून दिवसभर विश्रांती अवस्थेत ठेवून रात्रीच्या वेळी त्याच परिसरात मुक्त विहारासाठी सोडून दिले. पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी वेळीच उपचार केल्याने घुबडास जीवदान मिळाले आहे.
वाढती शहरीकरणे व वृक्षतोडीमुळे निसर्गचक्राचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या घुबडांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. भारतात एकूण पाच प्रकारचे घुबड आढळतात व ते निशाचर आहेत. दिवसा गड-किल्ले, घुमट, बुरुज आधी पुरातन वास्तूंमध्ये, मनुष्य वास्तव्य नसलेल्या ठिकाणी तसेच दाट झाडांच्या ढोलीत निद्रिस्त होऊन विश्रांती घेत असतात. सूर्यास्तानंतर उंदीर, घूस, साप-सरडे व कधीकधी लहान पक्षी यांसारख्या खाद्याच्या शोधात बाहेर पडतात. मान 180 अंशांच्या कोनामध्ये फिरण्याचे वैशिष्ट्य असलेल्या या पक्ष्याच्या अंगावर अतिशय तलम पिसे असतात. उदी रंगाच्या पिसावर काळे ठिपके तसेच चेहरा माणसासारचा वाटत असल्यामुळे हा पक्षी रुबाबदार व भेदक वाटतो.
मानवी समाजात घुबडाविषयी अनेक गैरसमज आहेत. याचे दर्शन झाल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते, तसेच एखाद्याने घुबडाकडे दगड भिरकावल्यास ते दगड पायात धरून घोळवतो व जसे दगड झिजतो, त्याप्रमाणे दगड भिरकावणाऱ्याचे शरीरपण झिजते... वगैरे गैरसमज आहेत. घुबड शेतकऱ्यांना अतिशय उपकारक आहेत. माणसांनी त्यांच्या वंशावर बेतू नये, त्यांनी घुबडांना भिऊन त्यापासून दूर राहावे, या हेतूने पूर्वजांनी वरील गैरसमज पसरवल्याचे मत डॉ. कुंभार यांनी व्यक्त केले.
कावळ्यांच्या हल्ल्यामुळे जखमी अवस्थेत आढळलेला घुबड हा गव्हाणी घुबड प्रकाराचा आहे. अकलूज येथील अकलाई मंदिर व भुईकोट किल्ला परिसरातील जुन्या वृक्षांवर या घुबडांचा वावर आहे.
- डॉ. अरविंद कुंभार,
पक्षी अभ्यासक
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.