पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर सत्ता मिळवली त्याच शेतकऱ्यांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कापून आघाडी सरकारने अवलक्षण दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज तोडाल तर गाठ माझ्याशी आहे, असा गर्भित इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (शुक्रवारी) येथे दिला.
येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वीज वितरण कंपनी आणि ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. या वेळी दरेकर म्हणाले, राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. अशा संकट काळात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे, यासाठी राज्यभरात आंदोलने केली. परंतु, या बहिऱ्या सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. यापुढे शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा साधा प्रयत्न जरी केला तरी वीज वितरण कंपनीला आणि सरकारमधील मंत्र्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यपालांना विमानातून उतरवण्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असून, त्यांनीच प्रवास परवानगीची फाईल थांबवून ठेवली होती, असा खळबळजनक आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
जेजुरीत जसे पुतळा उद्घाटन झाले तसे राज्यात यापूर्वी अनेक ठिकाणी पुतळा उद्घाटनाचे कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्यावर कधी गुन्हे दाखल झाले आहेत का, असा प्रतिप्रश्न केला. आमदार पडळकर यांच्यावरच का गुन्हा दाखल केला, याचं सरकारने उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांची मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता किती दिवस टिकणार हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आमच्या पक्षातून महाविकास आघाडीत कोण कशाला जाईल, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला.
पुण्यातील एका तरुणीने आत्महत्या केली. यात विदर्भातील मंत्र्याचे नाव आले आहे. जर या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्याची चौकशी करावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
या वेळी प्रवीण दरेकर यांचा सत्कार भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शहर अध्यक्ष विक्रम शिरसट, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, लक्ष्मण शिरसट, लक्ष्मण धनवडे, बादलसिंह ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर भाजप पदाधिकारी शिरीष कटेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या वेळी त्यांनी भाजप पक्ष तुमच्या सोबत आहे, कोणत्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन भाजप नेते किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात बेनामी संपत्ती जमा केली आहे. या खरेदी- विक्री व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांच्या बगलबच्च्यांच्या संपत्तीची देखील चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते सोमय्या किरीट यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.