पत्नीवर संशय घेऊन तिचे केस पकडून शिवीगाळ करत खाली आपटल्याची घटना ओम गर्जना चौक परिसरातील उद्धव नगरात घडली.
सोलापूर : पत्नीवर संशय घेऊन तिचे केस पकडून शिवीगाळ करत खाली आपटल्याची घटना ओम गर्जना चौक परिसरातील उद्धव नगरात घडली. अंकिता शीतलकुमार गायकवाड यांनी पतीविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत (Vijapur Naka Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार पती शीतलकुमार सुरेंद्र गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा (Solapur Crime) दाखल झाला आहे. तत्पूर्वी, पती शीतलकुमार याने अंकिताला विचारले, तू कोणाला फोन केला? कशासाठी केला होता? त्यानंतर पतीने पत्नी अंकिताचे केस पकडून खाली आपटले. त्या वेळी शिवीगाळ करत नाकावर मारून दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक सोनार हे पुढील तपास करीत आहेत.
हुंडा कमी दिल्याने विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न
हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून व माहेरून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेलाटी परिसरातील शेंडगे वस्ती येथे घडली. या प्रकरणी शोभा यशवंत कोले यांनी सलगर वस्ती पोलिसांत पतीसह सासरच्यांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पती यशवंत मल्लिनाथ कोले, शाकुबाई मल्लिनाथ कोले, मल्लिनाथ भीमराव कोले (सर्वजण रा. शेंडगे वस्ती, बेलाटी, ता. उत्तर सोलापूर) व आप्पा शेंडगे (रा. मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, विवाहानंतर आजपर्यंत सासरकडील मंडळींनी माहेरुन एक लाख रुपये आण, विवाहात आम्हाला हुंडा कमी दिला आहे, असे म्हणून दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस नाईक भोरे हे करीत आहेत.
बंद घर फोडून रोकड अन् दागिने लंपास
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घोंगडे वस्ती (गांधीनगर) येथील अंबाला रेसिडेन्सीत घडली. या प्रकरणी नागेश अंबाजी कुचन यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, नागेश कुचन हे कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराचा बंद दरवाजा तोडला. घरात प्रवेश करून घरातील 20 हजार रुपये आणि साडेतेरा हजारांचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.
वाळूच्या कारणावरून दगडफेक
आमच्या बांधकामाची वाळू का घेता, म्हणून दगडफेक करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जुळे सोलापुरातील आर्य चाणक्य नगरात घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असून, मुबारक हुसेन चौधरी यांच्या फिर्यादीनुसार विष्णू लक्ष्मणराव पवार, मंगल विष्णू पवार, गणेश चव्हाण, सोनाली गणेश चव्हाण, संध्या विलास पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर विष्णू पवार यांच्या फिर्यादीनुसार मुबारक चौधरी, रिजवाना चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, विष्णू पवार यांना तुम्ही आमच्या बांधकामाचे वाळू का घेता, असे विचारल्यावर त्याने, मी रस्त्यावर पडलेली वाळू घेतल्याचे सांगितले. त्यावरून त्याने शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर दुसरे फिर्यादी विष्णू पवार यांच्या म्हणण्यानुसार, घरासमोर टाकलेली वाळू व खडी कोणाची आहे, असे विचारल्यावर घराशेजारील चौधरी यांनी कंपाउंडच्या बाहेर येऊन आमचे नाव का सांगतो म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली. आम्ही तुमचे नाव सांगितले नाही म्हटल्यावर चौधरी यांनी हाताने मारहाण करण्यास सुरवात केली आणि घराच्या दिशेने दगडफेक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मस्के हे करीत आहेत.
चोरट्याने घरातून पळविले मोबाईल
चोरट्याने घरात प्रवेश करून दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना विजयपूर रोडवरील कमला नगरात घडली. सुरेश तुकाराम पवार यांनी या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे. तत्पूर्वी, उघड्या दरवाजातून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील अठरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल घेऊन तो चोरटा पसार झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस नाईक निकम हे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.