अकलूजमध्ये आता भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु झाल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येऊ लागले आहे.
श्रीपूर (सोलापूर) : संभाव्य अकलूज नगरपरिषदेत कोणकोणत्या गावांचा समावेश असावा, याबाबत राजकीय नेत्यांमध्ये टोकाची मतभिन्नता दिसून येत आहे. आजवर एकमुखी निर्णय होणाऱ्या अकलूजमध्ये आता भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु झाल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येऊ लागले आहे. (politics has begun among political leaders over a possible akluj municipal council)
अकलूज आणि माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत व्हावे, अशी आमदार रणजितसिंहांची मागणी आहे. या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मंगळवार (दि.२२) पासून साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थिती लावलेल्या या आंदोलनात आमदार रणजितसिंह, भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते-पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, पंस.चे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिंप.,पंस., ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग आहे.
अकलूज, माळेवाडीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही हा निर्धार या जन आंदोलनातून व्यक्त होत आहे. केवळ राजकीय आकसातून अकलूजची नगरपरिषदेची मागणी प्रलंबित ठेवली आहे, असा आरोप केला जात आहे. त्यासाठी वैराग आणि माळेगाव (जि.पुणे) नगरपंचायत निर्मितीचे उदाहरण दिले जात आहे. या मागणीला काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध नसून केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. विधानपरिषदेच्या मतदार याद्या तयार होण्यापुर्वी जर, अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत अस्तित्वात आली तर, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसेल अशी भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे ऐकूण उपमुख्यमंत्री अजित पवार अकलूज नगरपरिषदेच्या निर्मितीत खोडा घालत आहेत. असा थेट आरोप येथे केला जातोय. तर, भाजपच्या नेत्यांची ही मागणी म्हणजे केवळ राजकीय फार्स असल्याची टीका काँग्रेसचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यानिमित्ताने बोलताना ते म्हणाले, 1985 साली अकलूज ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 27 हजार होती. त्यात शंकरनगर, आनंदनगर, माळीनगर, संग्रामनगर, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी, माळेवाडी या आठ गावांचा समावेश होता. त्यावेळी विभागणी केली नसती तर, तेव्हाच नगरपरीषद झाली असती. 2021 च्या नोंदीनुसार जुन्या अकलुजची संख्या सुमारे 1लाख 5 हजार च्या आसपास आहे. त्यामुळे जुन्या अकलुजलाही विकासात सामावून घेतले पाहिजे. जुन्या अकलुजला वगळून केवळ अकलूज व माळेवाडीची नगरपरिषद करण्यामागे राजकीय डाव आहे. तालुक्यात नगरपरिषद व नगरपंचायत वाढवून विधानसभेचे मतदार वाढवायचे आणि जुन्या अकलूजमधील गावे बाहेर ठेऊन, जिप. व पंस.च्या जागा कमी होऊ दयायच्या नाहीत.
सगळीकडे आपण सत्तेत राहिले पाहिजे, यासाठी हा अट्टाहास आहे. त्यामुळे, जुन्या अकलूज परिसरासह नगरपरिषद झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रत्येक पातळीवर प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी सर्व प्रकारच्या आंदोलनाची ही आमची तयारी आहे. असे डॉ. धवलसिंह यांनी नमूद केले आहे. दरम्यान यशवंनगर आणि संग्रामनगर ग्रामपंचायतीचा समावेश संभाव्य नगरपरिषदेत करावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मंत्रालयाचे दार ठोठावले आहे. यशवंनगर व संग्रामनगर या ग्रामपंचायती अकलूजच्या विभाजनातून उदयास आलेल्या आहेत.
अकलूज, यशवंनगर, संग्रामनगरसाठी एकच संयुक्त पाणीपुरवठा योजना आहे. त्यामुळे या गावांचा समावेश नगरपरिषदेत झाला पाहिजे, अशी मागणी श्री. साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. महाळूंग श्रीपूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यामुळे महाळूंग जिप गट संपुष्टात आला आला आहे. त्यानंतर आता शंकरनगर व यशवंतनगरचा समावेश नगरपरिषदेत झाला तर, अकलूज, शंकरनगर व यशवंतनगर या तीन जिप गटांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे संभाव्य अकलूज नगरपरिषदेत कोणकोणत्या गावांचा समावेश होईल, याची चिंता राजकीय मंडळींना सतावताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.