अडीच वर्षांच्या काळानंतर हॅट्ट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे.
सोलापूर : शहर-जिल्हा हा कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, मोदी लाटेत या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. तरीही, महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील कोणालाच संधी मिळाली नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचा आहे, तर जिल्ह्यात भाजपचे (BJP) सर्वाधिक आमदार आहेत. कॉंग्रेसच्या हाती त्यादृष्टीने काहीच नाही. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर जिल्ह्यातील कॉंग्रेसची मदार आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसला बळ देऊन आमदारांमध्ये वाढ व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळावी म्हणून अडीच वर्षांच्या काळानंतर हॅट्ट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे.
सोलापूर महापालिकेवर वर्षानुवर्षे कॉंगेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच सत्ता होती. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे कायम वर्चस्व राहिले. मात्र, मोदी लाटेत भाजपने वर्षानुवर्षाच्या सत्तेला खिंडार पाडले. जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून विधानसभेचे सहा तर विधानपरिषदेचा आमदार भाजपचाच आहे. महापालिकेवर भाजपची सत्ता असून जिल्हा परिषदेतील सत्तेलाही भाजपचाच टेकू आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपच सर्वाधिक मोठा पक्ष आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर भाजपने सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने जिल्ह्याला दोन मंत्रिपदे दिली. त्यांनी पक्षाचा तो विश्वास सार्थ ठरवत सोलापूर जिल्हा हा कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही ओळख पुसण्यात यश मिळविले. राज्याच्या सत्तेत बदल झाल्यानंतर भाजपसह एमआयएम, वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते विस्कळित होऊ लागल्याचे बोलले जात आहे. त्यांना आपलेसं करून घेण्यासाठी मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणे ही जमेची बाजू मानली जाते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अनेकजण राष्ट्रवादीत आले तर काहीजण अजूनही इच्छुक आहेत. मरगळलेली राष्ट्रवादी पुन्हा कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेच्या तुलनेत डोईजड होऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात मोठा पक्ष कॉंग्रेसच हे दाखवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळायला हवे, असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
सुशीलकुमार शिंदे जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा पराभव पत्करल्यानंतर शिंदे हे राजकारणापासून दुरावल्याचे चित्र आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून ते केंद्रीय गृहमंत्रिपदापर्यंत मजल मारलेले सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचे समजताच त्यांच्या 'जनवात्सल्य' बाहेर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी पाहायला मिळायची. देशातील सत्ता भाजपकडे गेल्यांनतर आता ते जिल्ह्याच्या राजकारणात फारशे सक्रिय नसल्याने ती गर्दी ओसरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसची ताकद वाढवून पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरच आहे. पक्षासाठी त्यांचे योगदान निश्चितपणे मोठे असून त्याची त्यांना निश्चितपणे पोचपावती मिळेल, असेही पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
शहर 'मध्य'चे मताधिक्य घटले
जाई-जुई विचार मंचच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोचलेल्या प्रणिती शिंदे यांनी आमदारकीच्या पहिल्याच 2009 मधील विधानसभा निवडणुकीत 'हम भी किसी से कम नही' म्हणत विरोधकांना झटका दिला. माजी आमदार नरसय्या आडम यांचा त्यांनी 33 हजार 364 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांना 'एमआयएम'चे तौफिक शेख यांनी तगडी फाईट दिली. त्यावेळी नऊ हजार 769 मतांनी त्यांचा विजय झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारून 12 हजार 719 मतांनी हॅट्ट्रिक साधली. पहिल्या निवडणुकीच्या तुलनेत मागील दोन्ही निवडणुकीतील मताधिक्य धोक्याची घंटा असून त्यात वाढ करण्याच्या हेतूने आता मंत्रिपदाची संधी मिळायला हवी, अशी मागणी कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते करू लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.