नव्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळाच्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळणार आहे.
सोलापूर : सोलापूर (solapur)जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी विद्यमान संचालक मंडळातील जवळपास पाच संचालक निवडणुकीसाठी (election)अपात्र ठरणार आहेत. हे पाचही संचालक दोन्ही संघटनांमधील प्रमुख आहेत. यांच्या अपात्रतेमुळे संघटनेतील नव्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळाच्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळणार आहे.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक उन्हाळ्यात होण्याची शक्यता आहे. 19 संचालक असलेल्या या पतसंस्थेचे जवळपास आठ हजार सभासद जिल्हाभर आहेत. पतसंस्थेच्या नियमावलीमध्ये निवडणूक लढविणार्या संचालकांची पाच वर्षापैकी किमान अडीच वर्ष सेवा राहणे गरजेचे आहे. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या संचालकाची सेवा अडीच वर्षापूर्वीच समाप्त होणार असेल तर अशा सभासदाला पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळातील जवळपास पाच संचालक सेवानिवृत्त होत असल्याने ते आगामी निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर (कै.) शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्या गटाची सत्ता आहे. मागील निवडणुकीत दोन्ही गटाने एकत्र येत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. या संचालक मंडळातील शिवाजीराव पाटील गटाचे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, पंढरपूर शहराचे संचालक उत्तमराव जमदाडे, पंढरपूर ग्रामीण चे संचालक दादाराजे देशमुख, करमाळ्याचे संचालक बाळासाहेब गोरे हे चार जण पाटील यांच्या गटाचे संचालक आहेत. मात्र त्यांची सेवा अडीच वर्षांपूर्वी समाप्त होत असल्याने ते आगामी निवडणुकीत अपात्र ठरणार आहेत. याशिवाय थोरात गटाचे वैरागचे संचालक बब्रुवान काशीद यांची ही सेवा अडीच वर्षापूर्वी समाप्त होणार असल्याने तेही या आगामी निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत. अपात्र ठरणाऱ्या पाच संचालकांमध्ये पाटील गटाचे चार तर थोरात गटाच्या एका संचालकांचा समावेश आहे.
अपात्र होणारे संचालक हे संघटनेतील प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांच्या अपात्रतेमुळे संघटनेतील नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना पतसंस्थेवर काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पाटील व थोरात गटाच्या विरोधात शिक्षक समिती मैदानात उतरली होती. मात्र आगामी निवडणुकीत शिक्षक समिती मध्ये झालेल्या विभागणीचा काय परिणाम होतो हे येणारा काळच ठरवणार आहे. शिक्षक समिती एकसंघ राहिलेली नाही. त्यांना मागील निवडणुकीत यश मिळाले नव्हते. मात्र आता शिक्षक समितीचे शिक्षक समिती व आदर्श शिक्षक समिती असे विभाजन झाल्याने आगामी काळात पतसंस्थेच्या निवडणुकीत नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तरच सांगली बँकेच्या सभासदांना करता येणार मतदान
जिल्ह्यातील अनेक शिक्षक सांगली शिक्षक बँकेचे सभासद आहेत. सांगली बँकेचे सभासद झाल्याने जवळपास पाचशे ते सहाशे शिक्षकांनी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मात्र सांगली शिक्षक बँकेत सभासद असलेल्या व सोलापूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थमध्ये मागील दोन वर्षांपूर्वी जर शिक्षक सभासद असतील तर त्यांना सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत मतदान करता येणार आहे. त्यामुळे या सांगली शिक्षक बँकेच्या सभासदांचाही सोलापूरच्या पतसंस्थेच्या निवडणुकीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.