Raosaheb Patil defeated Namdevrao Jagtap in 1985 election 
सोलापूर

निवडणूक न लढवताही झऱ्याच्या पाटलाने करमाळ्याचे आमदार नामदेवराव जगतापांना हरवलं होतं

योगेश कानगुडे

करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्या, तरी आजपर्यंतचा इतिहास आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे.

विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणुकीवर लागलेले असते. येथील विधानसभेच्या निवडणुका नेहमी चुरशीच्या झाल्या आहेत. त्यातही 1985 मध्ये झालेली निवडणूक सर्वत्र चर्चेत असते. नामदेवराव जगताप यांचा अनपेक्षित असा पराभव या निवडणुकीत झाला होता. त्या वेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब पाटील यांना (34500 मते) निवडून दिले, तर जगताप यांना 23956 मते पडली होती. 

या निवडणुकीत रावसाहेब पाटील निवडून येईपर्यंतचा प्रवास मात्र फारच मनोरंजक आहे. रावसाहेब पाटील यांना निवडून आणण्यात करमाळा तालुक्याचे नेते, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक व माजी पंचायत समिती सभापती विलासराव पाटील यांचा मोठा वाटा होता. त्यांनी "ई-सकाळ'शी बोलताना या निवडणुकीबद्दलच्या आठवणी सांगितल्या. रावसाहेब पाटील यांच्या उमेदवारीचा खरा प्रवास सुरू झाला तो नाशिक जिल्ह्यातून. त्याचं झालं असं, की करमाळा तालुक्‍यातील मार्केट कमिटीच्या 17-18 जणांचा गट देवदर्शनासाठी गेला होता. तिरुपती-बालाजी, अयोध्या, दिल्ली ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचे दर्शन असा दौरा होता. हा दौरा नाशिकमध्ये असताना निवडणुकीची घोषणा झाली. त्या वेळी या गटातील सर्वांनी "विलासराव पाटील यांनी नामदेवराव जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवावी' अशी गळ टाकली. परंतु, विलासराव पाटील यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे असमर्थता दाखवली. विलासराव पाटील यांच्याइतका सक्षम उमेदवार कोणीही नव्हता. त्यांनी नकार दिल्यामुळे दुसऱ्या सक्षम उमेदवाराचा शोध घेणं आवश्‍यक होतं. उमेदवार ठरवण्यासाठी सभापती भवनला बैठक घेण्यात आली. या बैठकीला भगवात बागल, गिरधरदास देवी, पोपट पाटील, विलासराव पाटील, रावसाहेब पाटील या प्रमुख नेत्यांसह अनेक नेते उपस्थित होते. त्यात अनेक नावांवर चर्चा झाली. शेवटी रावसाहेब पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. 

हेही वाचा : गीता काळे या भावाप्रमाणे करतात आपल्या दिव्यांग दिराची दैनंदिन सर्व कामे
ज्वारी सील केल्याच्या मुद्द्यावर जगताप गट फुटला 

उमेदवारीचा अर्ज भरून प्रत्यक्ष प्रचाराला सुरवात करण्याच्या दरम्यान जगताप गटातील काही कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून त्यांची ज्वारी सील करण्यात आली. ज्वारी सील केल्यानंतर कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढली. ही अस्वस्थता विलासराव पाटील यांनी बरोबर हेरली. तत्कालीन पुरवठा अधिकारी विलासराव यांचे मित्र असल्याने त्यांनी जगताप गटातील या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या ज्वारीवरचे असलेले सील काढण्यास मदत केली. ज्वारीचे सील उठल्यानंतर जगताप गटातील एक-एक कार्यकर्ता फुटून रावसाहेब पाटील यांच्या पाठीमागे उभा राहात गेला. त्याचवेळी नामदेवराव जगताप यांचे विरोधक असणारे अण्णासाहेब जगताप यांनी रावसाहेब पाटील यांच्यामागे उभा राहण्याचा शब्द दिला. अण्णासाहेब जगताप यांच्या गटाचा पाठिंबा मिळाल्यामुळे या गटाची ताकद आणखी वाढली. 

रात्रीचा प्रचार ठरला लाभदायक 
रावसाहेब पाटील यांच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने विलासराव पाटील यांच्यासह दोन-चार नेत्यांकडे होती. वेगवेगळे विभाग तयार करून विभागानुसार प्रचार करण्याची रणनीती आखली. लोकांच्या शेतावर, वस्तीवर असेल त्या परिस्थितीत प्रचार केला. विलासराव यांनी दिवसा फारसा प्रचार न करता रात्री प्रचार करण्यावर भर दिला. कारण, रात्री गावातील सर्व लोकांशी संपर्क साधण्यास सोपे जात असे. रात्रीचा प्रवास करताना कुठे खूप चांगला प्रतिसाद मिळत होता तर कुठे अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातील एक प्रसंग सांगताना विलासराव पाटील म्हणाले, की वाशिंबे या गावात प्रचाराला गेलो असता आम्ही गावात प्रवेश करू नये म्हणून रस्त्यावर लोकांनी काट्यांचे फास टाकले होते. तरीही अशा परिस्थितीत आम्ही गावात प्रवेश मिळवला आणि गावकऱ्यांशी बोललो. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला मतदानातून चांगला प्रतिसाद मिळाला. 

रावसाहेब पाटील बोलण्यास समोर येत नव्हते 

निवडणूक प्रचारात रंगत निर्माण झाली होती. परंतु उमेदवार असलेले रावसाहेब पाटील मात्र काय भाषण करीत नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाली. त्यावेळेस रावसाहेब पाटील यांच्या बाजूने असणारे नेते आपल्या भाषणात सांगत असे, की रावसाहेब पाटील यांना बोलताना घशात त्रास होत आहे. डॉक्‍टरांनी त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते सभेत भाषण करू शकणार नाहीत. 

गाढव सोडून सभा उधळवण्याचा प्रयत्न अयशस्वी 

रावसाहेब पाटील यांच्यासाठी करमाळा मुख्य चौकात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सभेचे नियोजन होते. सभेची तयारी पूर्ण झाली होती. प्रचंड गर्दी जमली होती. त्यात विरोधी गटाकडून काही लोक घुसवून सभा उधळवणार असल्याची कुणकुण रावसाहेब पाटील यांना लागली. त्यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक यांच्या मदतीने तो डाव उधळवला. परंतु विरोधी गटांनी दुसरा डाव आखला, तो म्हणजे सभेत गाढव सोडायचे. ठरल्याप्रमाणे दहा ते बारा गाढवं त्यांनी सभेच्या ठिकाणी सोडले; परंतु लोकांनी त्यांना हाकलून लावले व सभा यशस्वी झाली. 

जगताप गटाकडून शेवटी कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न 
करमाळा मुख्य चौकात बबनराव पाचपुते यांची सभा झाल्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललं आहे, हे नामदेवराव जगताप यांच्या लक्षात आले. त्यांनी रावसाहेब पाटील यांच्या बाजूचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. त्याची जबाबदारी सुरवातीला रावसाहेब यांना पाठिंबा देणाऱ्या अण्णासाहेब जगताप यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी पहिला संपर्क साधला तो विलासराव पाटील यांना. परंतु, त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. हे सर्व धुडकावत विलासराव पाटील यांच्यासह बाकीचे सर्व नेते ठामपणे रावसाहेब पाटील यांच्यामागे उभे राहिले. शेवटी नामदेवराव जगताप यांचा पराभव करण्यात या गटाला यश आले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT