तिसंगी (सोलापूर) : भारतीय ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित वेस्ट झोन स्पर्धा छत्तीसगडमध्ये नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील संघाने सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र संघातून साहिल मुलाणी याची भालाफेक या क्रीडा प्रकारासाठी निवड करण्यात आली होती. या क्रीडा प्रकारात साहिल मुलाणीने 51.80 मीटर भाला फेकून वेस्ट झोन स्पर्धेत सिल्व्हर पदक प्राप्त केले.
या भालाफेक स्पर्धेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, दादर नगर हवेली, गोवा अशा विविध राज्यांतील उत्कृष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. साहिल मुलाणीचे यश हे यश सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. साहिल ग्रामीण भागातील फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. वडील प्राथमिक शिक्षक आहेत तर आई घरकाम करते. त्याचे प्राथमिक शिक्षण फुलचिंचोली येथे, माध्यमिक शिक्षण राहुल गांधी माध्यमिक विद्यालय, फुलचिंचोली, वामनराव माने प्रशाला, भैरवनाथवाडी येथे झाले. सध्या उच्च शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे सुरू आहे.
या सामान्य कुटुंबातील मुलाने शहरी मुलांपेक्षा चांगली कामगिरी करून महाराष्ट्र संघात आपले नाव कोरले. आज साहिल मुलाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व वेस्ट झोन स्पर्धेत करीत आहे. साहिल हा शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धीप्रमुख पप्पू मुलाणी यांचा सुपुत्र आहे. यशस्वी कामगिरीबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, जिल्हाध्यक्ष अरुण नागणे, सरचिटणीस तानाजी बाबर, कार्याध्यक्ष काका थोरबोले, कोषाध्यक्ष दत्तात्रय कोकडे, भारत साठे, क्रीडा मार्गदर्शक शिवाजी वसपटे आदींसह सोलापूर जिल्ह्यातून साहिलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साहिल हा सामान्य शिक्षक कुटुंबातील मुलगा आहे. त्याने क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी शिक्षक वर्गासाठी अभिमानाची बाब आहे.
- नवनाथ गेंड,
राज्य अध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र
माझा मुलगा साहिलला खेळाची आवड आहे. शिक्षणाबरोबर खेळात प्रगती करत आहे. त्यासाठी मी व माझी पत्नी दोघांनी त्याला खेळात करिअर करण्याची संधी दिली आहे.
- पप्पू मुलाणी,
साहिलचे वडील
साहिलला लहानपणापासून खेळाची आवड आहे म्हणून त्याला क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची परवानगी दिली. साहिलने आज महाराष्ट्राचे नाव सिल्व्हर पदक मिळवून भारतात केले. साहिलचा अभिमान वाटतो.
- नौशाद मुलाणी,
साहिलची आई
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.