सांगली : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा अंकली ते शिरोली पुढचा टप्पा नव्या वर्षात सुरू होत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून जमीन अधिग्रहणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये जमीन व्यवहारांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. या नव्या पुलाच्या कामात महापूर पट्ट्यात भराव घातल्यास तो सांगली शहरासह कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या नावांना आणखी बुडवणारा ठरेल. अंकली व धामणी येथे महामार्गात भराव घालून जी चूक केली आहे, ती पुढे होता कामा नये, याबाबत महामार्ग प्राधिकरणाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगली शहराबाहेरून गेलेल्या रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना महापुराचा कोणताही विचार केला नव्हता. अंकली आणि धामणी ही गावे कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराने पाण्याखाली जातात. या पट्ट्यात प्रचंड पाणी असते. आता तेथे महाकाय भराव टाकण्यात आला आहे. एक प्रकारे येथे छोटे धरण बांधण्यात आले आहे. त्याला पाणी अडेल आणि सांगलीकडे तुंबत राहील, अशी भीती आहे. त्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. ती चूक आता सांगलीच्या मुळावर उठणार आहेच, मात्र किमान येथून पुढे जे काम होणार आहे, त्यात तरी सुधारणा व्हावी, यासाठी सांगलीतून दबावगट गरजेचा आहे.
आता अंकलीतून पुढे रस्त्याचे काम सुरू होणार आहे. ते कृष्णा नदी पार करून जाईल. कृष्णेवर मोठा पूल होईल. त्याच्या अलीकडे भराव टाकला जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याऐवजी संपूर्ण महापूर पट्ट्यात कप्पे करणे आवश्यक आहे, तरीही त्याचे खांब हे महापुराला अडथळा करणार आहेतच, मात्र भरावापेक्षा ते बरे, असे म्हणण्याची वेळ आहे. त्याबाबत महामार्ग प्राधिकरणाने अद्याप काही स्पष्ट केलेले नाही. परंतु भराव टाकणार असाल तर आम्ही काम बंद पाडू, असा इशारा भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी अधिकाऱ्यांना भेटून दिला आहे.
या गावांतून महामार्ग
मिरज तालुक्यातील अंकली; हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, तारदाळ, मजले, हातकणंगले; शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव, चिपरी, कोंडिग्रे, नांदणी, धरणगुत्ती, जयसिंगपूर या गावांत पुलाचे काम होणार आहे. या गावांत जमीन खरेदी-विक्रीवर सध्या निर्बंध आणण्यात आले आहेत.
पूलच पूल चोहीकडे
कृष्णा नदीवरच्या पुलात आणखी एकाची भर पडणार आहे. सांगलीत सध्या बायपास पूल, आयर्विनला समांतर पूल, आयर्विन पूल, हरिपूर पूल, अंकलीचे दोन पूल, अंकली रेल्वे पूल आहे. त्यात आता राष्ट्रीय महामार्गावर चारपदरी भलामोठा पूल होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना भेटून याबाबत विनंती केली आहे. अंकली व धामणी गावांमध्ये महामार्गाला भराव घालून मोठी चूक केली आहे. आता पुढील कामात किमान पूरपट्ट्यात शंभर टक्के कप्पे करायला हवेत. ते नियोजनात नसतील तर महामार्गाचे काम होऊ देणार नाही.
- पृथ्वीराज पवार, भाजप नेते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.