Sangali Esakal
सोलापूर

Sangali : दरोड्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंगला अटक,सांगली पोलिसांची कारवाई; कारागृहातूनच कट

तो सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर देशभरात ३२ गुन्हे दाखल आहेत

सकाळ डिजिटल टीम

सांगली : सहा महिन्यांपूर्वी शहराच्या मार्केट यार्ड परिसरातील ‘रिलायन्स ज्वेल्स’ या शोरूमवर भरदुपारी घातलेल्या दरोडाप्रकरणातील मुख्य सूत्रधार, कुख्यात दरोडेखोरास बेऊर पटणा कारागृहातून अटक करण्यात आली. सुबोध सिंग ईश्‍वर प्रसाद सिंग (रा. चिश्‍तीपूर, थाना-चंडी, जि. नालंदा, बिहार) असे त्याचे नाव आहे.

तो सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर देशभरात ३२ गुन्हे दाखल आहेत. कारागृहातूनच तो टोळीचे नेतृत्व करत असून, तेथेच त्याने या दरोड्याचाही कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.

सहा महिन्यांपूर्वी मार्केट यार्ड परिसरातील ‘रिलायन्स ज्वेल्स’वर नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून पावणेसात कोटींचे दागिने घेऊन मोटारीतून पलायन केले होते. पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या शोरूमवर दरोडा पडल्याने याप्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली.

या घटनेनंतर पोलिस दल खडबडून जागे झाले. तपासाची यंत्रणा गतिमान केली. बिहार, ओडिशा येथे एलसीबीची पथके पाठवण्यात आली. त्यानंतर गणेश उद्धव बद्रेवार (हैदराबाद), प्रताप अशोकसिंग राणा (बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (बिहार) या चार संशयितांची नावे जाहीर करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओडिशा येथे अशाच पद्धतीने पुन्हा रिलायन्स ज्वेल्सवर दरोड टाकण्यात आला. तेथे तो डाव फसल्याने तिघे पोलिसांना सापडले. त्यात अंकुरप्रताप रामकुमार सिंग हा देखील होता. तो सांगलीतील दरोड्यात वाहनचालकाच्या भूमिकेत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दरोड्यावेळी शेवटच्या क्षणी तो शोरूममध्ये गेला होता. इलेक्ट्रिशन असल्याने सीसीटीव्ही बंद करून डीव्हीआर ताब्यात घेतल्याची कबुली त्याने दिली.

त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपासाची सूत्रे फिरवली व या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार सुबोध सिंग असल्याचे समोर आले. तो सध्या बेऊर पटणा येथील आदर्श सेंट्रल जेलमध्ये असल्याची माहिती पथकास मिळाली. तेथील पोलिसांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. आज (ता. ३) पहाटे त्याला विश्रामबाग पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केले असता १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीत त्याच्याकडून कसून चौकशी केली जाणार असून, त्यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करत आहेत. कारवाईत सहायक निरीक्षक तानाजी कुंभार, उपनिरीक्षक पठाण, अतिब काझी, कुमार पाटील, अंमलदार संदीप गुरव, सागर लवटे, बसवराज शिरगुप्पी, श्री. चव्हाण, आर्यन देशिंगकर, संकेत कानाडे, संदीप घस्ते यांचा सहभाग होता.

कारागृहातून व्हिडिओ कॉलद्वारे दरोडा

पोलिसांनी अटक केलेल्या संशयित सुबोध सिंग हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने कारागृहातूनच टोळीचे नेतृत्व केले. तेथे मोबाईलमध्ये इंटरनेट आणि फेसबुक मेसेंजरद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे दरोडेखोरांना सूचना केल्या. तसेच त्याच्या टोळीतील साथीदारांबरोबर गुन्हा घडण्यापूर्वी आणि प्रत्यक्ष गुन्हा घडतेवेळी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होता. हा दरोडा त्यानेच घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

वित्तीय संस्थांवर दरोडे

बँका, ज्वेलरी शॉप, सोने कर्ज देणाऱ्या मुथ्थुट फायनान्स, मणःपुरम गोल्ड यासारख्या सोन्याचे व्यवहार करणाऱ्या वित्तीय संस्थांवर देशभरात दरोडे घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा प्रमुख संशयित सुबोध सिंगच आहे. तो कारागृहातूनच साथीदारांच्या मदतीने देशभरात गुन्हे घडवून आणतो. आतापर्यंत त्याच्यावर देशभरात दरोड्याचे ३२ गुन्हे दाखल आहे. याशिवाय खून, खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, दंगल, अवैध शस्त्र बाळगणे, फसवणूक आदी गंभीर गुन्हेही दाखल आहेत.

‘टेक्नोसॅव्ही’ सुबोध सिंग

सुबोध सिंग याने अभियांत्रिकीची पदविका प्राप्त केली आहे. तो टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्यक्ष गुन्हा घडत असतानाही तो व्हिडिओ कॉलद्वारे कारागृहातून सूचना करत होता. डिव्हिआर मशीन कुठे ठेवले आहे, इथपर्यंतची इत्यंभूत माहिती त्याच्याकडे असते. देशभरात अशाच पद्धतीने त्याने गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय स्थानिकांची कोणतीही मदत तो गुन्ह्यात घेत नाही.

कडक सुरक्षा व्यवस्था

सुबोध सिंग हा सध्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. इतका सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांनीही चोख व्यवस्था ठेवली आहे. त्याच्या चौकशीवेळी कामालीची गोपनीयताही बाळगण्यात आली आहे. दरोड्यातील मुख्य कडी आता पोलिसांच्या हाती लागल्याने अन्य कड्याही लवकरच पोलिसांच्या रडारवर असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

Cannabis Farm in Dhule: धुळ्यात सव्वा दोन एकरात गांजाची लागवड, सहा कोटींचा माल... भयानक शेती पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime : मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT