मोहोळ शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण! अ‍ॅडजस्टमेंटमुळे शिवसैनिकांची पंचाईत esakal
सोलापूर

मोहोळ शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण! अ‍ॅडजस्टमेंटमुळे शिवसैनिकांची पंचाईत

मोहोळ शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण! अ‍ॅडजस्टमेंटमुळे कट्टर शिवसैनिकांची पंचाईत

चंद्रकांत देवकते

शिवसेनेला लागलेल्या गटबाजीच्या ग्रहणातही नेते, उपनेते व पदाधिकाऱ्यांनी ऍडजस्टमेंटचे धोरण स्वीकारल्याने कट्टर शिवसैनिकांची मात्र पंचाईत झाली आहे.

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील शिवसेनेमध्ये (Shiv Sena) सद्य:स्थितीत अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, संघर्षमय परिस्थितीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (NCP) कट्टर पारंपरिक विरोधक म्हणून निर्माण केलेली ओळख शिवसेनेतील नेते, उपनेते व पदाधिकाऱ्यांच्या एकमेकांवरील कुरघोडी करण्याच्या वाढत्या प्रकारामुळे काळाच्या पडद्याआड जाते की काय? अशी परिस्थिती सध्या शिवसेनेमध्ये दिसत आहे. परिणामी शिवसेनेला लागलेल्या या गटबाजीच्या ग्रहणातही नेते, उपनेते व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानिक राजकारणामध्ये अ‍ॅडजस्टमेंटचे धोरण स्वीकारल्याने कट्टर शिवसैनिकांची मात्र पंचाईत झाली आहे.

शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष संजय ऊर्फ काकासाहेब कमलाकर देशमुख यांच्या प्रदीर्घ अशा सोळा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कालखंडानंतर अखेर सेनेचा तालुकाध्यक्ष बदलण्यात आला. शहर व ग्रामीण असा वाद निर्माण होऊन पेनूरच्या चरणराज चवरे यांना तालुकाध्यक्ष करण्यात आले. मात्र काही महिन्यांतच अध्यक्षपदामध्ये पुन्हा बदल करून कामती येथील अशोक भोसले यांची तालुकाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. दरम्यानच्या काळात काका देशमुखांचे अध्यक्षपद गेल्यामुळे पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय अशा विविध कार्यालयांतला माजी तालुकाध्यक्षाचा राबता कमी झाल्याने त्यांनी संघटनात्मक कामाऐवजी वैयक्तिक कामांकडे अधिक लक्ष केंद्रित केले.

शिवसेनेचे दुसरे हेवीवेट नेते दीपक गायकवाड ऊर्फ मेंबर यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार आचरण असल्यामुळे त्यांचा निवडणुकीपुरता जनसंपर्क शिवसैनिकांना ऊर्जा व स्फूर्ती देण्यास कमी पडू लागला. माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी चाणाक्षपणे 'थांबा व पाहा'ची भूमिका घेतली. तर युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी संघटनात्मक कामाऐवजी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या जात पडताळणी बाबतच्याच प्रकरणावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चतुर व उच्चविद्याविभूषित नागेश वनकळसे यांनी संधी शोधत विविध कामांच्या निमित्ताने मंत्रालयात संपर्क वाढवत सामाजिक समस्या हाताळण्यास सुरुववात केली आहे. परिणामी सेनेच्या विधानसभा तिकिटावर पर्मनंट दावा सांगणाऱ्या क्षीरसागर व वनकळसे यांचा सुप्त राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

दरम्यानच्या काळात दोघांनीही वारंवार जनतेच्या समोर आपली भूमिका मांडण्यासाठी मीडियाचा अधिक खुबीने वापर सुरू केला आहे. युवासेनेचे महेश देशमुख यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेत अधूनमधून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. अशा वातावरणात दसऱ्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार यांनी युवासेनेचे विक्रम पंडित देशमुख यांच्या सहकार्याने विद्यमान तालुकाध्यक्ष अशोक भोसले यांच्या विरोधामध्ये जाहीर बैठक घेत सेनेतली अंतर्गत खदखद उघडपणे मीडियासमोर जगजाहीर केली. तर पेनूरच्या चरणराज चवरे यांनी 'पेनूर एके पेनूर' हा पाढाच फक्त ध्यानीमनी ठेवला.

एकंदरीत, नेते समजल्या जाणाऱ्या प्रत्येकाचाच सेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याऐवजी स्वत:चे ठळक अस्तित्व जपण्याचाच अधिक अट्टहास होताना दिसतो आहे. अशा प्रकारची सेनेची अंतर्गत स्थिती असताना, महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष असूनही तालुक्‍यात मात्र आमदारकीसह सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्यामुळे राज्यात सत्तेत असूनही इथे मात्र 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी परिस्थिती सेनेची आहे. एकंदरीत, असे सर्व वातावरण असतानाही शिवसेनेमध्ये गट -तट वगैरे काही नसून फक्त शिवबंधन हाच एकच विचार आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, मोहोळ शहर व ग्रामीणमधील व्यक्तिनिष्ठेची गटबाजी जनतेला उघडपणे स्पष्ट दिसू लागली आहे. परिणामी, या व्यक्तिनिष्ठ वाढत्या गटबाजीला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेळीच आवर नाही घातला, तर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद आदी निवडणुकांमध्ये शिवसेनेला याची जबर किंमत मोजावी लागेल, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT