अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे चालविले जाणारे प्रकल्प विशेषतः ग्रामविकास व ग्रामीण भागांमध्ये रोजगार निर्मितीसाठी साहाय्य करणाऱ्या उत्पादनांच्या अनुषंगाने येथे महिलांमार्फत तयार केल्या जाणाऱ्या अगरबत्तीचा सुगंध आता सातासमुद्रापार सुद्धा दरवळत आहे.
विश्व फाउंडेशन संचलित यज्ञनगरी शिवपुरी येथे वेद व आयुर्वेद याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवपुरी परिसरातील एकूण 32 महिलांना या अगरबत्ती उत्पादन करणाऱ्या उद्योगात वर्षभर रोजगार उपलब्ध होत आहे. विश्व ग्लोबल या प्रकल्पांतर्गत शरीर व मन यासाठी लाभदायी असणाऱ्या उत्पादनांचे निर्माण व ती उत्पादने विश्वभर सहजपणे मिळावीत यासाठी शिवपुरी ही संस्था गेल्या 40 वर्षांपासून काम करीत आहे. आता ही उत्पादने घरपोच पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आपल्या जीवनामध्ये सुदृढ व आरोग्यपूर्ण शरीराच्या प्राप्तीसाठी विविध नैसर्गिक साधनांचे विशेष महत्त्व आहे. संस्थेतर्फे निर्माण केल्या जाणाऱ्या या प्रत्येक उत्पादनांमध्ये उच्च प्रतीची औषधी वनस्पती व इतर घटकांना शास्त्रीय पद्धतीने एकत्रित तयार करून ही उत्पादने तयार केली जातात. त्यांच्याद्वारे चालविले जाणारे हे प्रकल्प विशेषतः ग्रामविकास व ग्रामीण भागांमध्ये रोजगार निर्मितीसाठी सहाय्य करतात. याचबरोबर अनेक अशा सेवा संस्था ज्या पारंपरिक कला संगोपन, सामाजिक उन्नती, पर्यावरण रक्षण यासाठी कार्य करतात, त्या संस्थांची उत्पादनेसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्याचे काम ही संस्था करीत आहे.
देश-विदेशात पोचली उत्पादने
शिवपुरीची सर्व उत्पादने आपले जीवन आरोग्यपूर्ण, सुखी आणि तेजस्वी करण्यासाठी सहाय्य करतात. म्हणून अगरबत्तीची या ठिकाणी तयार होणारी 80 पेक्षा अधिक उत्पादने आता विदेशात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. यात प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादने जात आहेत, ही जमेची बाजू आहे.
"सुख, शांती व आरोग्याकडे' हा मूलमंत्र घेऊन भारतीय संस्कृतीचा एक भाग व नित्यनेमाने वापारात येणारी वस्तू म्हणून अगरबत्ती निर्माणाचे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण नैसर्गिक व अग्निहोत्र भस्म व इतर शुद्ध कच्चे पदार्थ वापरत केवडा, व्हिटीवर्ट, दवना, अंबर, जस्मीन, लेव्हेंडर, कापूर, मस्क, पाचोली, लिली, तुळस, चाफा, गुलाब यांसारख्या 80 पेक्षा जास्त प्रकारच्या अगरबत्ती देश-विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरून याचा सुगंध मात्र सर्वत्र दरवळतो आहे. यासाठी लागणारा कच्चा माल हा मुख्यत्वे बंगळूर, म्हैसूर, पुणे व मुंबई येथून मागविला जात आहे. इथे काम करणाऱ्या महिलांना दररोज रोजगार उपलब्ध होत असून रोलिंग, कलरिंग, धूप कोन तयार करणे, पॅकिंग या कामांचे महिलांना प्रशिक्षण दिले जात असल्याने अधिक चांगल्या प्रकारे उत्पादने तयारी होत आहेत.
या महिलांच्या माध्यमातून जीवन चक्रा, वास्तू, सुगंध व नैसर्गिक आदी विविध प्रकारांतून 80 हून अधिक सुवास असलेल्या अगरबत्तींची निर्मिती होत आहे. एवढ्या नैसर्गिक प्रकारच्या अगरबत्ती मात्र वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. शिवपुरीचे हे काम जागतिक दर्जाचे, भारतीय संस्कृती जतन करणारे व स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देऊन अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहे, हे विशेष होय.
शिवपुरीचे अग्निहोत्र व योग प्रसाराचे कार्य जगभर मोठ्या जोमाने होत आहे. स्थानिक महिलांना या अगरबत्ती उद्योगातून रोजगार मिळत आहे. हा उद्योग आता भविष्यात अधिक फलनिष्पत्ती देणारा व विकासाचा दीर्घकालीन पल्ला गाठणारा ठरणार आहे, यात संदेह नाही. आपली सर्व उत्पादने आपले जीवन आरोग्यपूर्ण, सुखी आणि तेजस्वी करण्यासाठी सहाय्य करतात.
- डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले,
अध्यक्ष, शिवपुरी, अक्कलकोट
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.