माचणूर (ता. मंगळवेढा) येथे भीमा नदीकाठावर कडेकपारीत प्राचीनकालीन हेमाडपंती भव्य असे देखणे श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे.
ब्रह्मपुरी (सोलापूर) : माचणूर (ता. मंगळवेढा) (Machnur, Taluka Mangalwedha, Solapur) येथे भीमा नदीकाठावर (Bhima River) कडेकपारीत प्राचीनकालीन हेमाडपंती भव्य असे देखणे श्री सिद्धेश्वराचे मंदिर (Siddheshwar Temple) आहे. वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे एक विलोभनीय ठिकाण असून, निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक येथे भेट देत असतात.
सोलापूरपासून 40 किलोमीटर व मंगळवेढ्यापासून 14 किलोमीटर अंतरावर माचणूर तीर्थक्षेत्र आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी भागांतून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. भूवैकुंठ पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन होऊन माचणूर दिशेला प्रवाहित होणारी भीमा नदी येथून वाहत आहे. या नदीला येथे चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. याच गावाला नाथाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे प्राचीनकाळी ऋषिमुनी तपस्येला बसत असत. मंदिर व परिसरातील काळ्या पाषाणापासून बांधकाम केले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी नदी कडेच्या बाजूला भव्य असा सुंदर घाट बांधला आहे. नदीच्या पात्रात सुंदर देखणे जटाशंकर मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस ह. भ. प. बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.
मठाच्या लगतच मुघलकालीन औरंगजेब बादशाहाचा किल्ला आहे. बादशाहाने रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये सुरू केला. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर येथे ब्राह्मणांचे अधिष्ठान असते. या महिन्यामध्ये पूजा-अर्चासाठी औरंगजेब कालावधीत अर्थसहाय्य मिळत असे. औरंगजेबाने चार वर्षे येथील छावणीत राहून दिल्लीचा कारभार पाहिला होता. येथे श्री शंकराचार्य, श्री स्वामी समर्थ, सीताराम महाराज, बाबा महाराज आर्विकर आदी संत येऊन गेले आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणूर येथील मुस्लिम समाजाकडे असून, पूजाअर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे आजतागायत आहे.
जवळची प्रेक्षणीय ठिकाणे
संत भूमी मंगळवेढा : माचणूरपासून 12 किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा असून, मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे श्री संत दामाजी मंदिर, संत चोखामेळा मंदिर, हजरत पीर वो मर्दाने गैब (रह.) दर्गाह, संत कान्होपात्रा मंदिर, हेमाडपंती महादेव मंदिर व भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे
दर्गाह : माचणूर गावाच्या नदी पात्रापलीकडे बेगमपूर (ता. मोहोळ) येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले मॉंसाहेब बेगमबी (रह.) यांचा दर्गाह आहे.
भुईकोट किल्ला : सिद्धेश्वर मंदिरालगतच नदी पात्राबाजूस कडेकपारीत असलेले मुघलकालीन औरंगजेब बादशाहाने 1695 मध्ये बांधलेला भुईकोट किल्ला आहे.
समाधी स्थळ : माचणूर गावालगत ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील नदी काठाजवळ राजमाता जिजाऊंचा वारसा असलेले राजे रावजगदेवराव यांचे समाधीस्थळ आहे.
बालगणेश : माचणूर गावापासून 12 किलोमीटर अंतरावर सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथील नदी पात्रातील स्वयंभू मातुर्लिंग गणपती मंदिर आहे.
खवय्यांसाठी खास...
श्री दामाजीपंतांची भूमी म्हणून ओळख असलेला मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. मंगळवेढा तालुक्याच्या शिवारात पिकणारी मालदांडी ज्वारी देशभर प्रसिद्ध आहे. मालदांडी ज्वारीला शासनाचे जीआय मानांकन मिळाले आहे.
मंगळवेढा तालुक्यात खास रानमेवा म्हणजे कडवंची, पात्रेची भाजी, चिगळ प्रसिद्ध आहे. अतिशय कमी किमतीमध्ये मिळणारा हा रानमेवा घेण्यासाठी अनेकजण तालुक्यास येतात.
तालुक्यात सेंद्रिय पद्धतीने केला जाणार गूळ तसेच काकवी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये बासुंदी, खवा, कंदी पेढे तयार केले जातात, तेही प्रसिद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.