करकंब येथील उजनी डावा कालव्याच्या 33 नंबर फाट्यामध्ये ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन मायलेकरांसह पाच जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मयत सर्वजण मध्यप्रदेशातील असून ट्रॅक्टर चालकाविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री सवाअकाराच्या सुमारास उसाचा ट्रॅक्टर भरून कारखान्याकडे रवाना केल्यानंतर ऊसतोड कामगार एमएच 45 एस 1183 ह्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून ते राहत असलेल्या मदने वस्तीकडे निघाले होते. यावेळी ट्रॅक्टर बागवान वस्तीजवळील डाव्या कालव्याच्या फाट्यामध्ये कोसळला. यामध्ये ट्रॉली पूर्ण पलटी होऊन त्याखाली सर्व कामगार अडकले होते. कामगारांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला करून सर्वांना करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सरवदे यांनी अरविंद राजाराम कदछे ( वय 2), प्रिया नवलसिंह आर्या (वय 2), सुरीका विरसिंग डावर (वय 16), मकबाई नवलसिंग आर्या (वय 23) सर्वजण राहणार कोलके, ता.वरला, जि. बडवाणी (मध्यप्रदेश) यांना मृत घोषित केले. राजाराम देवसिंग कवछे (वय 23), रिंकू सुमरिया कवछे (वय 16) व सुनीता राजाराम कवछे (वय 23) ह्या जखमींवर उपचार सुरू आहेत. दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पण त्यापैकी एकाच तेथे पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला असून एकावर उपचार चालू आहेत.
घटनेची माहिती समजताच करकंब चे उपसरपंच आदिनाथ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, आदींनी अपघातग्रस्तांना मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.