रोपळे बुद्रूक - आष्टी (ता. मोहोळ) येथील ऐतिहासिक तलाव फ्लेमिंगो पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. हे रुबाबदार परदेशी पाहुणे पक्षी पाहून पक्षी व निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या पक्ष्यांच्या आगमनामुळे यंदा दुष्काळ पडणार अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
आष्टी तलावातील पाण्याची पातळी कमी होते, तेव्हाच या तलावात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. २०१३ च्या दुष्काळात या तलावातील पाणी हळूहळू कमी होत असताना, हे पक्षी मोठ्या संख्येने आले होते. यंदा तब्बल दहा वर्षांनंतर हे पक्षी आष्टी तलावात दाखल झाले आहेत. या तलावावर फेरफटका मारला असता सुमारे १०० ते १५० फ्लेमिंगो पक्षी दिसून आले. तलावातील पाणी आटल्यामुळे हे पक्षी तलावाच्या मध्यभागी जाऊन अन्नाचे भक्षण करत होते.
या तलावात मानवी हस्तक्षेप फारसा होत नाही. त्यामुळे हा तलाव पक्ष्यांना सुरक्षित वाटतो. तलावातील पाणी आटत आल्यावरच हे पक्षी या तलावात येतात. त्यामुळे यंदा दुष्काळ पडेल का अशी चिंता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. असे असताना पावसाळा अजून संपला नाही. अधून-मधून थोडाफार पाऊस पडतोय. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे आष्टी तलावात फ्लेमिंगोंचे आगमन झाल्यामुळे नेमकं काय घडतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या वेळी २०१२-१३ च्या दुष्काळात आष्टी तलावात फ्लेमिंगो पक्षी आले होते. तेव्हा दुष्काळ पडलाच होता. यंदा तर उजनी धरण अजून पाण्याने भरले नाही. या तलावातील पाणी आटू लागले आहे. त्यातच हे पक्षी आल्यामुळे यंदा दुष्काळाची चिन्हे दिसू लागली आहेत.
- अर्जुन भोसले,
शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर
फ्लेमिंगो पक्षी आल्यामुळे दुष्काळ पडतो याला शास्त्रीय आधार नाही. मात्र यंदा हा तलाव पाण्याने भरला जाणार नाही. त्यामुळे आहे त्या पाण्यातील अन्न खाऊन लवकर परत जावे, असा संकेत या पक्ष्यांना आला असावा. म्हणून हे पक्षी आष्टी तलावात लवकर आले असावेत.
- डॉ. अरविंद कुंभार,
पक्षीतज्ज्ञ, अकलूज
फ्लेमिंगो पक्ष्याची वैशिष्ट्ये
फ्लेमिंगो या पक्ष्याला मराठीत रोहित म्हणतात. याचे Phoenicopterus Phoenicoparrus हे शास्त्रीय नाव आहे. हा पाणथळ जागी थव्याने राहणारा फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या या पक्ष्याची पिसे लाल रंगाची असतात. म्हणून याला अग्निपंख असेही म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.