सोलापूर: गेले दोन दिवस शहरात वाहणारी गुलाबी हवा, पूर्व भागातील नेत्यांच्या घरासमोर वाहनांचा ताफा, जंगी स्वागत, विकासात्मक चर्चा अन् पक्षप्रवेशाची ऑफर... अशा वातावरणात तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सोलापूर वारीने अनेकजण सुखावले आहेत.
काँग्रेस, भाजप पक्षात घुसमट होत असलेल्या, अडगळीत पडलेल्या जिवाला बीआरएस पक्षाने नवा आधार बनून सोलापुरात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘मिशन २०२४’साठी सध्या राजकीय पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे.
या पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे का नाही? याच्या चाचपणीसाठीच केसीआर यांनी सोलापुरात दोन दिवसांचा पहिला प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी होणार की नाही? हा येणारा काळच ठरविणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोलापूर जिल्ह्यात राजकीय बस्तान बांधण्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची मदत घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात अडगळीत पडलेल्या या अनुभवी नेत्यांवर पूर्व भागातील तेलुगू भाषिक समाजाला मायभूमीची आठवण करून देण्याची जबाबदारी सोपविली. मात्र सादूल यांचे वय आणि आरोग्य यांची सांगड घालता पक्षाला युवा नेतृत्वाची गरज भासू लागली.
आठ नगरसेवक सोबत बाळगून ''आमदार'' होण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या महेश कोठे यांना बीआरएसकडून पक्षात येण्याची ऑफर दिली गेली. पण कोठे यांनी आमदारकीवर हात ठेवत ''बंपर धमाका''ची मागणी केली.
त्यांचा बंपर प्रस्ताव बीआरएसच्या ''पॅटर्न''मध्ये बसला नाही. त्यामुळे केसीआर यांचा मोर्चा भाजपमधील नाराज नेत्यांकडे वळला. या नाराजांची यादी तेलंगणाला पाठविण्यात आली. युवा नेतृत्व म्हणून नागेश वल्ल्याळ यांना बीआरएसने साद घातली.
भाजपमध्ये दोन देशमुखांच्या राजकारणात अडगळीत पडलेले आणि राजकीय अस्तित्वासाठी पक्षांतर्गत लढा देत असलेले नागेश वल्ल्याळ यांच्यासह चार माजी नगरसेवकांना केसीआर यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली.
भाजपच्या पाचही माजी नगरसेवकांना केसीआर यांनी ''तेलंगणा मॉडेल'' समजावून सांगून तेलुगू भाषिक समाजातील नेत्यांना मायभूमीची आठवण करून देण्यासाठी दोन प्रयोग केला.
पण ही प्रयोग चाचणी कितपत यशस्वी ठरणार? केसीआरचा फटका कोणाला बसणार? याचे राजकीय गणित अद्याप तरी जुळल्याचे दिसत नसले तरी राजकीय अस्तित्व अंधारात असलेल्या सोलापुरातील नेत्यांसाठी केसीआर मात्र नवे आशेचे किरण बनतील, यात शंका नाही.
पक्ष कोणताही असो, फटका काँग्रेसला
सोलापूर महापालिकेत नेहमीच भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाली आहे. २०१७ ला एमआयएएम पक्षाने महापालिका स्वबळावर लढली. त्याचा फटका काँग्रेसला बसला. सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली.
एमआयएमचे नऊ नगरसेवक निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा निळा झंझावात आला. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला.
आतापर्यंत नवीन पक्ष-नवीन नेतृत्व, असे ज्यांनी धोरण अवलंबले. त्याचा फटका हा काँग्रेसला बसला आहे.
२०२४ च्या निवडणुकीत आता केसीआर पक्ष स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. याचा फटका कोणाला बसणार हा केसीआर यांच्या दुसऱ्या प्रयोगात नेत्यांचे चेहरे समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.