सोलापूर : चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या गुरूनानक चौकातील जिल्हा रूग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारीअखेर रूग्णालयाचे लोकार्पण होणार असून, त्याच्या तयारीला वेग आला आहे. नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे जवळपास २८४ पदांची भरती होणार असून, त्याची प्रक्रियाही युद्धपातळीवर सुरू आहे. १५ दिवसांत फर्निचरचे काम संपविण्याचे नियोजन असून सुरवातीला जिल्हा रूग्णालयातील ‘ओपीडी’ सुरू केली जाणार आहे.
जिल्हा रूग्णालय एकूण २०० खाटांचे असून, त्यात १०० खाटा (बेड्स) महिला व बाल रुग्णालयासाठी तर १०० खाटा सर्वोपचार रुग्णांसाठी असणार आहेत. दोन्ही इमारती स्वतंत्र असून इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता फर्निचरची कामे शिल्लक असून राज्य स्तरावरून त्याची ऑर्डर झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली. स्त्री रूग्णालयात एकूण ९७ पदे भरली जात असून त्यात ४२ पदे नियमित व ५५ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
दुसरीकडे जिल्हा रुग्णालयासाठी नियमित ९२ तर बाह्य यंत्रणेद्वारे ९५ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २२ जून २०२२च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार ही पदभरती सुरू आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर सध्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. दुसरीकडे गोरगरीब रुग्णांच्या मोफत उपचाराची दर्जेदार सोय देखील होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी त्यात विशेष लक्ष घातले असून, जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय लवकर सुरू व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
१५ दिवसांत फर्निचरचे काम; तूर्तास उसनवारी
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा रूग्णालयाचे लोकार्पण होणार आहे, पण अजूनही रूग्णालयातील फर्निचरच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. काही दिवसांत राज्य स्तरावरून फर्निचर मिळेल व १५ दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, तूर्तास रुग्णालयात ओपीडी सुरू केल्यावर डॉक्टरांना बसायला टेबल-खुर्च्या व रुग्णांसाठीही खुर्च्या लागतील. त्यासाठी उसनवारी सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे रुग्णालयाला स्वत:ची एकच रुग्णवाहिका मिळाली असून आणखी काही रुग्णवाहिका लागणार आहेत.
जिल्हा रुग्णालयातील विभाग
सिटी स्कॅन
ट्रामा केअर युनिट
अपंग पुनर्वसन केंद्र
जळीत कक्ष
मनोविकृती चिकित्सा कक्ष
सुश्रुषा व प्रशिक्षण केंद्र
नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग
विशेष कक्ष
फेब्रुवारीतच लोकार्पण
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रूग्णालयाचा ताबा घेऊन दोन महिने झाले, तरीदेखील अद्याप फर्निचर मिळालेले नाही. पदभरतीही टप्प्याटप्पाने सुरू आहे. रूग्णालयाच्या स्वत:च्या रुग्णवाहिका नाहीत, अतिदक्षतासह इतरही महत्त्वाचे विभाग सुरू करण्यास वेळ लागणार आहे. तरीदेखील फेब्रुवारीअखेर रूग्णालयाच्या लोकार्पणाची तयारी सुरू झाली आहे हे विशेष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.